राजुरा–आसिफाबाद व राजुरा–आदिलाबाद मार्ग मोकळे करण्यासाठी प्रशासनाला साकडे
आमचा विदर्भ - वृत्तसेवा
राजुरा (दि. २९ जुलै २०२६) -
राजुरा नगर परिषद हद्दीतील राजुरा–आसिफाबाद व राजुरा–आदिलाबाद या मुख्य महामार्गांवरील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीवर गंभीर परिणाम होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषद राजुराचे उपाध्यक्ष दिलीप मुरलीधर डेरकर यांनी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज सादर करून अतिक्रमणाविरोधात तातडीने प्रभावी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, संबंधित महामार्गांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी यापूर्वी अनेक वेळा मोहीम राबविण्यात आली. मात्र, कारवाईनंतर काही दिवसांतच पुन्हा अतिक्रमण करून व्यावसायिकांनी रस्त्याच्या कडेला व्यवसाय सुरू केल्याने परिस्थिती पूर्ववत होत आहे. परिणामी, वाहनचालक, पादचारी तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
निवेदनात विशेषतः उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, राजुरा समोरील अतिक्रमणाचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. रुग्णालय परिसरात अतिक्रमणामुळे रुग्णवाहिका, आपत्कालीन वाहने तसेच रुग्णांना ये-जा करताना अडथळे निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या संदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही नगर परिषद प्रशासन आणि पोलिस प्रशासनाकडे पत्राद्वारे अतिक्रमण हटविण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही प्रभावी कारवाई झालेली नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
तसेच संविधान चौक, कर्नल चौक, नाका नंबर तीन, गडचांदूर रोड, येथीही मोठ्या प्रमाणात अतिक्रणम वाढले आहे. नगर परिषद प्रशासनाकडे वारंवार निवेदने व सूचना देऊनही ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. यामुळे अतिक्रमणाचा प्रश्न अधिकच गंभीर बनत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात उच्च न्यायालयाने अतिक्रमण हटविण्याबाबत दिलेल्या आदेशांचाही उल्लेख करण्यात आला असून, सार्वजनिक रस्ते मोकळे ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राजुरा–आसिफाबाद आणि राजुरा–आदिलाबाद मुख्य महामार्गावरील तसेच उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयासमोरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून नियमित देखरेख ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
या मागणीला नगर परिषदेतील अनेक नगरसेवकांनीही पाठिंबा दर्शविला असून निवेदनावर त्यांच्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अतिक्रमणाचा प्रश्न आता अधिक गंभीरपणे हाताळून प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
#RajuraNews #Chandrapur #ChandrapurNews #Encroachment #RoadSafety #HighwayEncroachment #TrafficIssue #RajuraAsifabadRoad #RajuraAdilabadRoad #MaharashtraNews #VidarbhaNews #RoadAccident #UrbanDevelopment #LocalNews #BreakingNews #RajuraMunicipalCouncil #CitizenSafety #Vidarbha #AmchaVidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.