Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विकासाच्या बुलडोझरखाली हिरवाईचा वनवास
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
एकेकाळी निंबांच्या कमानीतून जाणारे रस्ते आता उन्हाच्या ताब्यात ''जागतिक पर्यावरण दिन विशेष'' आमचा विदर्भ - दीपक शर्मा  राजुर...
एकेकाळी निंबांच्या कमानीतून जाणारे रस्ते आता उन्हाच्या ताब्यात
''जागतिक पर्यावरण दिन विशेष''
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. ०५ जुन २०२६) -
        आज जागतिक पर्यावरण दिन. त्यामुळे सकाळपासूनच सोशलमिडियावर झाडे वाचवा, पर्यावरण वाचवा, पृथ्वी वाचवा अशा घोषणा घुमत आहेत. मात्र पर्यावरण दिनानिमित्त राजुरा शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांसमोर दहा वर्षांपूर्वीचे चित्र उभे राहते. तहसील कार्यालयापासून तुलाना मार्गापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उंचच उंच कडूनिंबाची झाडे होती. ती इतकी जवळ आली होती की वरून एकमेकांना आलिंगन देत होती. उन्हाळ्यात नागरिकांना सावली मिळायची आणि पक्ष्यांनाही घर मिळायचे.

        मात्र नंतर विकास नावाच्या महाबलीचा शहरात प्रवेश झाला. वाहतुकीला अडथळा होतो म्हणून काही झाडे तोडण्यात आली. दुकानाचा बोर्ड दिसत नाही म्हणून काही झाडे गायब झाली. घरासमोर पाने पडतात म्हणून काही झाडांना निरोप देण्यात आला. काही झाडांनी स्वतःहून आत्मसमर्पण केले की त्यांना करवतीचा आधार मिळाला, हे मात्र अजूनही गूढच आहे.

        विशेष म्हणजे दरवर्षी शासनाकडून लाखो रुपये खर्च करून वृक्षारोपण मोहिमा राबवल्या जातात. पर्यावरण दिनी हजारो रोपे लावली जातात. फोटो काढले जातात. बातम्या प्रसिद्ध होतात. अभिनंदनाचे संदेश येतात. पण वर्षभरानंतर ती रोपे कुठे जातात, हा प्रश्न संशोधकांनाही पडावा असा आहे. काही नागरिकांच्या मते, राजुरातील काही रोपांना विशेष शक्ती प्राप्त झाली असावी. कारण लावल्याच्या काही दिवसातच ते अदृश्य होतात. काहींचा दावा आहे की ती रोपे थेट स्वर्गीय जंगलात स्थलांतरित होतात.

        दरम्यान, राजुरा तालुक्यातील कोळसा खाणी, कोल वॉशरीज आणि कोळसा वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या धुळीमुळे पर्यावरणाच्या समस्यांमध्ये आणखी भर पडत आहे. रस्त्यावरून कोळशाने भरलेले ट्रक गेल्यानंतर धुळीचा असा पडदा तयार होतो की नागरिकांना काही वेळ स्वतःचाच शोध घ्यावा लागतो. कोळसा खाण परिसरातील परिसरातील घरातील फर्निचरपेक्षा कोळशाची धूळ अधिक नियमितपणे दिसून येते.

        गडचांदूर परिसरातील नागरिकांनाही सिमेंट उद्योगांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी अनेकदा पुढे येतात. आंदोलने होतात, निवेदने दिली जातात, बैठका घेतल्या जातात आणि त्यानंतर पुन्हा पुढील आंदोलनाची तयारी सुरू होते. उद्योगांमुळे रोजगार निर्माण झाला, व्यवसाय वाढले आणि आर्थिक चक्र गतिमान झाले हे वास्तव नाकारता येणार नाही. मात्र दुसरीकडे धूळ, प्रदूषण, शेतीचे नुकसान आणि आरोग्याच्या समस्या याही वास्तवाचा भाग आहेत.

        खाणींच्या परिसरातील शेतकरी सांगतात की कधी कधी पिकांपेक्षा धुळीचाच थर जास्त दिसतो. काहींच्या मते, जर हीच परिस्थिती कायम राहिली तर भविष्यात "धूळ पिकवणारा शेतकरी" अशी नवीन शेती पद्धत सुरू होईल की काय अशी भीती वाटत आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरात वृक्षारोपणाचे कार्यक्रम सुरू असताना नागरिक मात्र एकच मागणी करीत आहेत. नवीन झाडे लावा, पण आधी उरलेली तरी जपा. कारण झाडे लावणे हा कार्यक्रम असतो, पण झाडे जगवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असते. अन्यथा पुढच्या काही वर्षांत राजुराचा इतिहास असा लिहिला जाईल, "एकेकाळी येथे हिरवेगार शहर होते. आता त्याच्या आठवणी आहेत आणि पर्यावरण दिनाचे फोटो आहेत."

#जागतिकपर्यावरणदिन #राजुरा #RajuraNews #गडचांदूर #WorldEnvironmentDay #SaveTrees #EnvironmentDay #CoalPollution #CoalMines #GreenRajura #TreePlantation #AirPollution #Gadchandur #EnvironmentalAwareness #RajuraCity #MaharashtraNews #GreenEnvironment #CoalDust #SaveEnvironment #EcoFriendly #ClimateAwareness #TreeConservation #RajuraTaluka #ChandrapurDistrict #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top