आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. २० मार्च २०२६) -
प्रेमांजली महिला बहुउद्देशीय संस्था, राजुरा यांच्या वतीने ८ मार्च रोजी जिवती तालुक्यातील तालुक्यातील रायपूर खडकी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात अंगणवाडी सेविका मीना पळवेकर यांच्या हस्ते आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व वीर रामा शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. गावकऱ्यांनी मान्यवर व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ महिला सुपाबाई आनंदराव सिडाम होत्या. तीन गावचे गावपाटील लेतू कोडापे, जयतू पाटील, रामा कोडापे यांचा मंचावरून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्त्या व संस्थेच्या अध्यक्षा चित्रलेखा धंदरे यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासावर मार्गदर्शन केले. महिलांसाठी कोणतेही कार्य अशक्य नसून शिक्षण हे महिला सक्षमीकरणाचे प्रभावी साधन आहे, असे त्यांनी सांगितले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत महिलांनी स्वतःचा व गावाचा विकास साधावा, हुंडामुक्त समाज घडवावा, प्लास्टिकमुक्त वातावरण राखावे आणि शेती व जंगलाचे संरक्षण करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच भारतीय सातेरी मधमाशीचे संवर्धन व पालन करून आर्थिक उत्पन्न वाढवण्याचे महत्त्व त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.
प्रमुख पाहुण्या कोलाम विकास फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुनिता कुभांरे यांनी गीत सादर करून वातावरण भारावून टाकले. त्यांनी स्वर्गीय विकास कुभांरे यांच्या कार्याची आठवण करून देत गावातील सामाजिक कार्याची स्मृती जागवली. यावेळी अंगणवाडी सेविका मीना पळवेकर व श्रेष्ठ महिला सुपाबाई सिडाम यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. प्रेमांजली संस्थेच्या वतीने स्व. आशाताई रागीट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ "पर्यावरण रक्षण पुरस्कार" संघर्ष पडवेकर यांना प्रदान करण्यात आला. संस्थेच्या सदस्या डॉ. भावना रागीट यांनी ज्युलॉजी विषयात पीएचडी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. गावातील महिलांनी गोंडी नृत्य सादर करून कार्यक्रमात उत्साह निर्माण केला.
कार्यक्रमाचे संचालन संकेत पडवेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन निकिता कोडापे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सचिव साधना येरमे, मीना डांगे, वत्सला चौधरी, माधुरी चालाख, पुष्पा उईके, चिऊ चालाख, कल्याणी मडावी, गंगूबाई सिडाम, मीराबाई कोडापे, मारोती कोडापे यांनी सहकार्य केले. तीन गावांतील मोठ्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होत्या.
#महिला_दिन #जागतिकमहिलादिन #महिला_सक्षमीकरण #RajuraNews #Jiwati #ChandrapurNews #WomenEmpowerment #RuralDevelopment #EnvironmentalAwareness #ChitralekhaDhandare #PlasticFreeVillage #GondiDance #TribalWomen #LocalNewsMaharashtra #SocialWork #WomenLeadership #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.