आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०७ ऑक्टोबर २०२५) -
राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत बल्लारपूरसह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील विविध प्रलंबित रेल्वे विषयक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. आ. मुनगंटीवार यांनी संबंधित समस्यांबाबत लेखी निवेदन रेल्वे मंत्र्यांना सादर केले.
गोल पुलियाजवळ उड्डाणपूल उभारणीची मागणी
बल्लारपूर शहरातील वस्ती विभागातील गोल पुलिया हा नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीचा प्रमुख मार्ग आहे. सध्या रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या लाईनचे काम सुरू असल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर गोल पुलिया परिसरात उड्डाणपूल (Flyover) उभारण्याची गरज असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी निवेदनाच्या माध्यमातून रेल्वे मंत्र्यांच्या निदर्शनास आणले.
बल्लारशा रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी पुढाकार
बल्लारशा रेल्वे स्थानकाच्या सर्वांगीण विकास, प्रवाशांच्या सुविधा आणि आवश्यक सुधारणा यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. आ. मुनगंटीवार यांनी स्थानकातील प्रवासी सुविधांच्या दृष्टीने बैठक घेऊन ठोस निर्णय घेण्याची विनंती केली. या चर्चेला रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
चंद्रपूर शहरातील स्थलांतरित मजुरांच्या पुनर्वसनाची मागणी
चंद्रपूर शहरातील रेल्वे स्टेशन यार्ड, सावरकर नगर, रय्यतवारी आणि लखमापूर परिसरात नवीन रेल्वे लाईनचे काम सुरू आहे. या भागात मागील २५ वर्षांपासून राहणाऱ्या मजूर कुटुंबांना स्थलांतराची नोटीस देण्यात आली आहे. या कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्याने, त्यांच्या तातडीने पुनर्वसनाची मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली.
रेल्वेच्या लीज जागांवरील व्यापाऱ्यांना दिलासा देण्याची मागणी
बल्लारपूर येथील मध्य रेल्वेच्या मालकीच्या जागेवर ४०-४५ वर्षांपासून विविध व्यापारी व्यवसाय करत आहेत. ही जागा रेल्वेकडून लीजवर दिलेली आहे. २६ जुलै २००४ रोजीच्या रेल्वे बोर्डाच्या पत्रानुसार, मूळ लायसन्सधारकांच्या जागी सध्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना अपवादात्मक स्वरूपात नवीन करार (Agreement) करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
२०११ मध्ये नागपूर रेल्वे मंडळाने ९ व्यापाऱ्यांना नवीन करार करण्यास मान्यता दिली होती, तरीदेखील आजपर्यंत प्रत्यक्ष करार झालेले नाहीत. या प्रकरणात काही व्यापाऱ्यांनी नागपूर उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केली असून न्यायालयाने रेल्वेला कारणे स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या व्यापाऱ्यांशी नवीन भूमी करार तत्काळ करण्याची कार्यवाही व्हावी, जेणेकरून दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न मार्गी लागेल व स्थानिक व्यापाऱ्यांना न्याय मिळेल, अशी विनंती आ. मुनगंटीवार यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली.
केंद्रीय मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
सर्व मुद्द्यांवर ना. अश्विनी वैष्णव यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने कार्यवाहीचे आश्वासन दिले. “बल्लारपूर आणि चंद्रपूरच्या जनतेच्या अपेक्षा आणि विकासाचा अजेंडा केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न निश्चितच फलदायी ठरेल,” असा विश्वास आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
#ChandrapurNews #Ballarpur #SudhirMungantiwar #AshwiniVaishnaw #IndianRailways #DevelopmentAgenda #RailwayProjects #PublicWelfare #VidarbhaDevelopment #ChandrapurUpdates #BallarshahStation #CitizenRelocation #RailwayReform #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.