राजूरा निवडणुकीतील धांधलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १९ सप्टेंबर २०२५) -
दिल्ली येथे गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत लोकसभा विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा विधानसभा क्षेत्रातील कथित मतदार घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला. या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी आरोप करताना सांगितले की, राजूरा क्षेत्रात हजारो मतदारांची नावे मतदार यादितून वगळण्यात आली तर ६८५० पेक्षा जास्त मतदारांचे नावे अतिरिक्तरीत्या समाविष्ट करण्यात आली. त्यांनी दावा केला की, ज्या मतदान केंद्रांवर काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर मते मिळाली होती, त्याच केंद्रांवर दलित, अल्पसंख्याक व ओबीसी मतदारांची नावे वगळण्यात आली. राहुल गांधी यांनी पुढे सांगितले की, अशा प्रकारचे घोटाळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि हरियाणा अशा राज्यांतही आढळले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार हे सर्व घोटाळे एका ठरावीक यंत्रणेच्या मार्फत संगनमताने घडवून आणले गेले आहेत. याबाबतचे आरोप सर्वप्रथम काँग्रेस जिल्हाध्यक्ष व राजूरा विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार सुभाष धोटे यांनी केले होते. त्यांनी माध्यमांपुढे आणलेला मुद्दा आता काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांपर्यंत पोहोचला आहे.
सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राजूरा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांचा ३०५४ मतांच्या फरकाने पराभव झाला होता. सुभाष धोटे यांना ६९,८२८ मते मिळाली होती. या क्षेत्रातील एकूण नोंदणीकृत मतदार संख्या ३,१५,०७३ होती, ज्यात पुरुष मतदार १,५९,८२१ तर महिला मतदार १,५५,२५२ एवढी होती.
पराभवानंतर सुभाष धोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन मतदार याद्यांतील अनियमिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी सांगितले होते की, जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केल्यानंतर प्रशासनाने ६८५३ पेक्षा अधिक मतदारांचे नावे मतदार यादितून कमी केली. तरीसुद्धा राजूरा व गडचांदूर परिसरात अतिरिक्त मतदारांचे नावे नव्याने समाविष्ट झाल्याचे प्रत्यक्ष पाहणीमध्ये उघड झाले. परंतु, या प्रकारात अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही, असा धोटे यांचा आरोप होता.
प्रशासनाची बाजू
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानेही बराच काळ लोटल्यानंतर स्पष्टीकरण दिले. प्रशासनाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार तक्रारीची प्रतीक्षा न करता प्रशासनाने स्वतःहून तपास केला असे स्पष्टीकरण दिले होते. या तपासात एकूण ६८६१ अर्ज वेळेत नाकारले गेले. त्यामुळे ते अर्ज मतदार यादित समाविष्टच करण्यात आले नाहीत. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे राजूरा येथे मतदार फसवणूक होण्यापासून टळली, असेही त्यांनी स्पष्ट केले.
#RajuraVoteScam #RahulGandhi #subhashdhote #ChandrapurPolitics #ElectionFraud #CongressVsBJP #RajuraAssembly #VotingRights #IndianDemocracy #PoliticalControversy #VoterListScam #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.