‘मधाचे गाव’ मांघरची अभ्यासभेट; ४० प्रशिक्षणार्थींना मध उत्पादनाचा थेट अनुभव
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १२ जून २०२५) –
राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर जिल्ह्याला 'हनी हब' बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मधमक्षिका पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी मामला व पिरली या गावांना ३ जानेवारी २०२४ रोजी ‘मधाचे गाव’ म्हणून घोषित करण्यात आले होते. या घोषणेनंतर प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक टप्प्याला सुरुवात झाली असून, जिल्ह्यातील ४० प्रशिक्षणार्थींनी साताऱ्यातील प्रसिद्ध ‘मधाचे गाव’ मांघर येथे अभ्यासदौरा केला. या अभ्यासदौऱ्यात प्रशिक्षणार्थ्यांनी मध साठवण, प्रक्रिया, विपणन आणि सामूहिक ग्रामविकास याबाबत सखोल माहिती घेतली. स्थानिक ग्रामस्थ व व्यवस्थापनाकडून प्रतिवर्षी ७ ते ८ हजार किलो मधाचे उत्पादन कसे घडवून आणले जाते, याचा अनुभव प्रशिक्षणार्थ्यांनी प्रत्यक्ष घेतला.
प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात CBRTI, पुणे आणि मधसंचनालय, महाबळेश्वर येथे प्रशिक्षणार्थ्यांना मधमक्षिका पालनाचे तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये पेटी व्यवस्थापन, किटकनाशकांचा परिणाम, पर्यावरणपूरक वनीकरण समन्वय आदी विषय समाविष्ट होते. या संपूर्ण उपक्रमामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर आर्थिक उत्पन्नवाढीचा एक शाश्वत पर्याय खुला होत असून, प्रशिक्षणार्थ्यांनी आमदार श्री. मुनगंटीवार यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी समुदायाला नवा पर्याय व दिशा मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.