नोकरीच्या नावाखाली बेरोजगारांची लूट
नेत्यांच्या नावाचा गैरवापर करून पैसे उकळण्याचे धंदे जोमात सुरु
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०४ जून २०२५) -
राजुरा तालुक्यातील बल्लारपूर वेकोलिच्या कोळसा खाणी प्रकल्पांत सुमारे 70 टक्के काम खासगी कंपन्यांकडून करून घेतले जात आहे. यामध्ये ओबी हँडलिंग, कोळसा ट्रान्सपोर्टिंग, साइडिंग व्यवस्थापन यांसारखी महत्त्वाची कामे आहेत. स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी पूर्वी अनेक आंदोलने झाली, आश्वासने देण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात या युवकांची फसवणूक करून बाहेरील लोकांना लावले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बुद्धा ओबी हँडलिंग कंपनीमध्ये नोकरी मिळवून देतो, असे सांगून शेकडो बेरोजगार युवकांकडून 30 ते 40 हजार रुपये उकळण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. काही स्वयंघोषित नेते, बोगस दलाल, आणि कंपनीच्या पीआरओसोबत संगनमत करून ही फसवणूक करत असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे या फसवणुकीसाठी काही लोक आमदार देवराव भोंगळे यांचे नाव वापरत असल्याची देखील माहिती आहे. मात्र, आमदार भोंगळेना या प्रकाराची माहिती नव्हती, असे समजते. मध्यस्थानी घुग्घूस, चंद्रपूर, तेलंगाणा, पाचगाव, चंदनवाही, विरूर स्टेशन येथील बाहेरील लोकांना कामावर लावल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिक युवकांना डावलण्यात आले असून, हा प्रकार अत्यंत गंभीर असून, संबंधित कंपनीवर सखोल चौकशी व तात्काळ कारवाईची मागणी जोर धरत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.