आईच्या प्रेरणेतून जन्मलेला उपक्रम : आ. किशोर जोरगेवार यांची सामाजिक बांधिलकी
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. २६ जून २०२५) -
“उद्याचे अधिकारी ‘अम्मा कि पढ़ाई’ केंद्रातूनच घडतील,” असा आत्मविश्वासपूर्वक विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला. गरीब, होतकरू व जिद्दी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमदार जोरगेवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला ‘अम्मा कि पढ़ाई’ उपक्रम आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर येथे औपचारिकपणे सुरू करण्यात आला. या उपक्रमांतर्गत ३ हजार विद्यार्थ्यांपैकी २८४ विद्यार्थ्यांची निवड चाचणी परीक्षेद्वारे करण्यात आली असून त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत दर्जेदार मार्गदर्शन व शिक्षण दिले जाणार आहे. यात मार्गदर्शन सत्रे, चाचणी परीक्षा, नोट्स, शिस्तबद्ध अभ्यास, आत्मविश्वासवाढ व विविध शैक्षणिक सुविधा समाविष्ट आहेत.
यावेळी उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, जिल्हाधिकारी विनय गौडा, आमदार किर्तीकुमार भांगडिया (चिमूर विधानसभा), जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंग, महसूल विभागाचे संजय पवार, महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी अध्यक्ष अरुण घोटेकर, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, प्रा. राजेश दहेगावकर, भाजप महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, तसेच तुषार सोम, दशरथसिंह ठाकूर, नामदेव डाहुले, संजय बेले, अजय जयस्वाल, कुणाल घोटेकर, राजू वेलंकीवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
“हा उपक्रम केवळ शिक्षणप्रदान नाही, तर शिक्षणासाठी झगडणाऱ्या माझ्यासारख्या अनेक अम्मांच्या त्यागाला सलामी आहे,” असे सांगून आ. किशोर जोरगेवार यांनी भावनिक वातावरण निर्माण केले. “आईच्या नावाने सुरू केलेला हा प्रकल्प घराघरात प्रेरणा देणारा ठरेल,” असे ते म्हणाले. हंसराज अहिर म्हणाले, “जोरगेवार यांनी त्यांच्या आईच्या प्रेरणेने हा समाजोपयोगी उपक्रम हाती घेतला आहे, हे प्रेरणादायी आहे.” जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, “हा उपक्रम समाजात शैक्षणिक समता निर्माण करण्याचे काम करेल.” आ. किर्तीकुमार भांगडिया म्हणाले, “मतदारसंघातील अभ्यासिकांपासून अधिकाऱ्यांपर्यंतचा प्रवास या उपक्रमाने शक्य केला आहे.” यावेळी इंडियन एअर फोर्समध्ये निवड झालेल्या प्रणल जनबंधू यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. अम्मा कि पढ़ाई केंद्रातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त आणि मोठ्या प्रमाणात सहभाग विशेष लक्षवेधी होता.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.