Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: भेदोडा बुध्द जयंती सोहळ्यात वाद: दोन गटांमध्ये तणाव
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भेदोडा बुध्द जयंती सोहळ्यात वाद: दोन गटांमध्ये तणाव समाजातील एकोप्याला तडा! महिलांवर हल्ला, प्रतिमा विटंबना आप आपले म्हणणे मांडण्याकरिता दोन...
भेदोडा बुध्द जयंती सोहळ्यात वाद: दोन गटांमध्ये तणाव
समाजातील एकोप्याला तडा! महिलांवर हल्ला, प्रतिमा विटंबना
आप आपले म्हणणे मांडण्याकरिता दोन्ही पक्षाच्या पत्रकार परिषदा
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा (दि. १६ मे २०२५) -
      राजुरा तालुक्यातील भेदोडा येथील बुध्द विहारात 12 मे रोजी बुध्द जयंतीच्या कार्यक्रमावेळी दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. या वादातून हातघाई झाली, ज्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. भेदोडा येथील बुध्द विहार परिसरात बुध्द जयंतीनिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. 8 गुंठे जमीन दान करणारे कवडू सातपूते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचे ठरविण्यात आले. मात्र गौतम रत्ने व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमास विरोध केला. या वादातून बुद्ध वंदना सादर करणाऱ्या मुलींवर हल्ला झाला. अनुप्रिया गणेश दुर्गे हिला खाली पाडून मारहाण करण्यात आली. डोक्याला मार लागून ती जखमी झाली. याशिवाय इतर महिलांनाही जखमी करण्यात आले.

        भेदोडा येथील प्रज्ञा शिल करूणा मंडळाच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी आणि गावातील सुमारे 50 नागरिकांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी या प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाईची मागणी केली. "भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची विटंबना झाली आहे. याचा आम्हाला तीव्र निषेध आहे," असे विश्वनाथ गोवर्धन यांनी सांगितले. 

        गौतम रत्ने व त्यांच्या समर्थकांनी मात्र हा वाद आर्थिक कारणावरून झाला असल्याचा दावा केला. त्यांच्या मते, बुध्द विहाराच्या निधीचा हिशोब दिला गेला नसल्यामुळे हा वाद निर्माण झाला. "गंगाराम रत्ने यांनी विहारासाठी काम केले आहे. त्यांना दरवर्षी ध्वजारोहणाचा मान मिळतो. मात्र यावेळी त्यांना दुर्लक्षित करण्यात आले," असे गौतम रत्ने यांनी सांगितले.

        प्रज्ञा शिल करूणा मंडळाच्या १४ तारखेच्या पत्रकार परिषदेला विश्वनाथ गोवर्धन, शंकर रत्ने, गणेश दुर्गे, मुरलीधर कांबळे, दिवाकर दुर्गे, सुरेश दहागावकर, रमेश मून, रोशन दुर्गे, राजु दहागावकर, वामन दुर्गे, मनोज दुर्गे, पंचफुला कांबळे, पालिका दहागावकर, रबिना दुर्गे, इंदीरा रत्ने, रोशनी दुर्गे, ललीता झाडे, सुमन दुर्गे, कमल मून, पार्वता भगत, प्रतिक्षा कांबळे यांचेसह गावातील महिला व पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते..
आर्थीक गैरव्यवहाराची पार्श्वभूमी, निष्पक्ष चौकशीची मागणी
दुसऱ्याही गटाने मांडली आपली बाजू 
        भेदोडा येथील बुध्द विहारात दिनांक 12 मे रोजी बुध्द जयंतीच्या दिवशी झालेल्या वादाला आर्थिक गैरव्यवहाराची पार्श्वभूमी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी राजुरा पोलिसांनी निष्पक्षपणे चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी दुसऱ्या गटातील भेदोडा येथील गंगाराम रत्ने, गौतम रत्ने, अंशुल लोखंडे, मधुकर गोरले, निर्दोष दुर्योधन, सिध्दार्थ लोखंडे यांचेसह अनेक महिला व पुरूषांनी दि. १५ मे रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केली. भेदोडा येथे बुध्द जयंती निमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, कार्यक्रमाच्या वेळी समाजातील दोन गटांमध्ये वाद झाला. गंगाराम रत्ने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, बुध्द विहार आणि वाचनालय बांधकामासाठी त्यांनी परिश्रम घेतले असून त्यांचे नाव आदराने घेतले जाते. मात्र, काही विरोधकांनी मुद्दाम वाद उकरून काढून त्यांचे अपमान केले आणि त्यांच्या गटातील सदस्यांना मारहाण केली. या हाणामारीत अंशुल लोखंडे हा गंभीर जखमी झाला असून काही महिलाही जखमी झाल्या.

        विरोधी गटाच्या मते, गटातील रकमेचा हिशोब दिला नसल्याने हा वाद निर्माण झाला. प्रज्ञा शिल करूणा मंडळाची जागा विक्री पत्राद्वारे रितसर विकत घेतली असून या जागेवर वर्षभर सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, काहींना हे मान्य नसल्याने चुकीचे आरोप करण्यात आले आहेत. पत्रकार परिषदेत गंगाराम रत्ने यांनी स्पष्ट केले की, पोलिसांनी निष्पक्षपणे चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची विटंबना झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्वांचे म्हणणे ऐकून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. पत्रकार परिषदेला नागोराव दुर्योधन, विनायक कांबळे, शंकर बोरकर, रामदास कांबळे, रणजीत मुरमाडे, सुजाता लोखंडे, पुष्पा मुरमाडे, वर्षा रत्ने, योगिता कांबळे, निळा दुर्योधन, रमा कांबळे, विजया दुर्योधन, लक्ष्मी लोखंडे यांचेसह गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलिसांनी हस्तक्षेप करून शांतता राखली
       राजुरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून दोन्ही गटांना शांत केले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दोन्ही गटांनी राजुरा पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. एकूण 55 जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. राजुरा पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. दोन्ही गटांशी चर्चा करून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

Next
This is the most recent post.
Previous
थोडे जुने पोस्ट

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top