swachta abhiyan
नगरपालिकेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष ; नाल्यांची सफाई तात्काळ करा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ३१ मार्च २०२५) -
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, शहरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची अजूनही सफाई झालेली नाही. परिणामी, नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचून दुर्गंधी पसरली आहे. चुनाभट्टीतील नागरिकांनी नगरपरिषदेकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. (nagar parishad rajura)
आरोग्य धोक्यात
नाल्यांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या आणि अन्य घाण कोंबून राहिल्याने सांडपाणी तुंबले असून, त्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होत आहे. परिणामी, साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिवाय, रस्त्यावरील कचरा नियमितपणे उचलला जात नसल्यामुळे परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य वाढले आहे. याकडे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नगरपरिषदेच्या यंत्रणेचा ढिसाळपणा
चुनाभट्टी परिसरातील रहिवासी सागर भटपल्लीवर, पंकज दुर्गे आणि इतर नागरिकांनी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी सांगितले की, संपूर्ण वर्षभरात वार्डातील नाल्यांची सफाई केवळ नावापुरती केली जाते. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही. तसेच, रस्त्यावर पडलेला कचरा नियमित उचलला जात नसल्यामुळे तो गुरेढोरे विखरून टाकतात आणि त्यामुळे संपूर्ण परिसर अस्वच्छ होतो.
घंटागाडी आणि कचरा व्यवस्थापनातील त्रुटी
नगरपालिकेने घराघरांवर हजेरीसाठी क्यूआर कोड लावले असले, तरी दिवसाआड येणाऱ्या घंटागाडीची कार्यक्षमता कमी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नाल्यांची सफाई नियमित होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, धूर फवारणी देखील केली जात नसल्यामुळे अस्वच्छता अधिकच वाढली आहे.
प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत
यावर अधिकाऱ्यांचे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे कंत्राटदार मनमानी करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. परिणामी, संपूर्ण शहरातील स्वच्छतेबाबत अनेक तक्रारी वाढल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी नाल्यांची आणि रस्त्यांची तातडीने सफाई करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास लवकरच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.