ट्रक चालकाचा मुलगा बनला पोलीस उपनिरीक्षक
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. ३१ मार्च २०२५) -
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेत जवाहर नगर, राजुरा येथील प्रशांत शशिकलाताई विजय भोयर यांनी पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर यश मिळवले आहे. दिनांक २५ मार्च २०२५ रोजी जाहीर झालेल्या निकालात त्यांची निवड झाली आहे.
प्रशांत हा एका सामान्य कुटुंबातील असून, त्याचे वडील विजय भोयर हे ट्रक चालक आहेत. त्यांनी मोठ्या जिद्दीने आणि अथक परिश्रमाने हे यश संपादन केले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर, राजुरा येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण शिवाजी हायस्कूल, राजुरा येथे झाले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी श्री शिवाजी महाविद्यालय, राजुरा येथे प्रवेश घेतला आणि विज्ञान शाखेत पदवी संपादन केली.
अभ्यास आणि संघर्षाची कहाणी
पदवी शिक्षण घेत असतानाच प्रशांतने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. यावेळी त्यांना आतिश धोटे सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये अवघ्या एका-दोन गुणांनी अपयश आले, मात्र प्रशांतने हार न मानता प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर तिसऱ्या प्रयत्नात त्याने PSI पद मिळवले आणि आपल्या कुटुंबाचे स्वप्न साकार केले.
प्रशांत मूळचे जयरामपूर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली येथील आहेत. त्यांचे वडील विजय भोयर यांची भारतीय सैन्यात निवड झाली होती, मात्र घरच्या विरोधामुळे त्यांना ती संधी सोडावी लागली. त्यांनी चंद्रपूर गाठून ट्रक चालक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. प्रशांतच्या मोठ्या भावाने सैन्यात भरती होऊन कुटुंबाचा सन्मान वाढवला, आणि त्याचाच आदर्श घेत प्रशांतने पोलीस उपनिरीक्षक पद मिळवले.
प्रशांतचे अभिनंदन आणि सन्मान
प्रशांतच्या या यशाबद्दल बादल बेले, सुवर्णा बेले यांनी त्याचा शाल, श्रीफळ, वृक्ष कुंडी आणि भारताचे संविधान भेट देऊन सत्कार केला. आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, पर्यवेक्षक तथा राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले, तसेच शिक्षक ज्योती कल्लुरवार, रोशनी कांबळे, रूपेश चिडे, जयश्री धोटे, सुनीता कोरडे, अर्चना मारोटकर, वैशाली टिपले, किसन वेडमे, प्राजक्ता साळवे, रजनी पिदुरकर यांनीही त्याचे अभिनंदन केले. संपूर्ण राजुरा परिसरात प्रशांतच्या यशाचा गौरव केला जात आहे. प्रशांत भोयर यांचे यश हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.