पेट्रोल पंपावर नाणे नाकारले
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर (दि. २९ मार्च २०२५) -
शहरातील तुकूम परिसरातील रोहीत (बियाणी) पेट्रोल पंपावर घडलेल्या एका प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. एका ग्राहकाने पेट्रोलसाठी १० रुपयांच्या नाण्यांनी पैसे दिले असता, पंप कर्मचाऱ्यांनी नाणी स्वीकारण्यास नकार दिला आणि त्याच्या वाहनातील पेट्रोल काढून टाकले. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, पंप व्यवस्थापनाच्या वर्तणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
घटनेचा व्हिडिओ व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार, मेजर गेटसमोर पानठेला चालवणाऱ्या एका व्यावसायिकाने आपल्या दुचाकीसाठी पेट्रोल भरले. पेट्रोलसाठी त्याने ९ नाणी (१० रुपयांची) दिली, मात्र पंपावरील महिला कर्मचाऱ्यांनी ती नाकारली. "आमच्या पंपावर नाणी स्वीकारली जात नाहीत, फक्त रोकडच चालते," असे सांगत ग्राहकाला रोख रक्कम देण्यास सांगण्यात आले. ग्राहकाकडे तत्काळ इतर रोख रक्कम उपलब्ध नसल्याने, कर्मचाऱ्यांनी त्याच्या वाहनातील संपूर्ण पेट्रोल काढून टाकले.
नागरिकांमध्ये संताप – प्रशासनाकडे कारवाईची मागणी
या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून, पंप व्यवस्थापनाच्या या अडेलतट्टू भूमिकेविरोधात कारवाईची मागणी केली जात आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, कोणत्याही वैध नाण्याला किंवा नोटेला कोणीही नकार देऊ शकत नाही. मात्र, या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने संबंधित पेट्रोल पंपावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे. सध्या प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.