सेवानिवृत्त मुख्याध्यापक खड्ड्यात पडून जखमी
सर्वच नादुरुस्त मार्गांची तातडीने दुरुस्ती करा - सचिन शेंडे
भारतीय जनता युवा मोर्चा ने दिले निवेदन
आमचा विदर्भ - न्यूज रिपोर्ट्स
राजुरा -
मागील वर्षीपेक्षा यंदा पावसाने चांगलीच कृपा केली आहे. महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुरू झालेला पाऊस टप्प्या टप्प्याने कोसळत आहे. पावसाच्या पाण्याने व बॅकवॉटर मुळे आठवड्याभरातच तालुक्याला दोनदा पुराचा सामना करावा लागला आहे. परिणामी, रस्त्यांवर पाणी साठून डांबर उखडण्याचे प्रकार घडत आहेत. उखडलेल्या डांबरांच्या जागी तातडीने पॅचिंग व रोलिंग करण्याची गरज असताना संबंधित विभागाकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. काही ठिकाणी मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला मात्र पावसाच्या एकाच दणक्यात व जड वाहतुकीमुळे चार दिवसात परिस्थिती जैसे थे झाली. तालुक्यातील व शहरातील मुख्य रस्ते दुरुस्त होण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत. परिणामी, वाहनचालकांना रस्त्यात पडलेल्या मस्तवाल खड्यातून ये-जा करावी लागत आहे. यातील दररोज काहीजण या खड्यात पडून गंभीर जखमीही होत आहे.
राजुरा येथे गडचांदूर मार्गावरील अहिल्यादेवी होळकर चौक ते भवानी मंदिर दरम्यान पावसा मुळे मोठे मोठे खड्डे पडले. हे खड्डे मृत्यूला निमंत्रण देत आहेत. दि. १९ जुलै ला याच मार्गाने जात असतांना शिवाजी हायस्कुलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक पुंडलिकराव उराडे सर हे दुचाकीने जात असताना खड्यात पडून जखमी झाले. अशी माहिती त्यांनी 'आमचा विदर्भ' ला दिली. त्याचप्रमाणे दररोज इतरही अनेकजण या खड्यात पडून जखमी होत असून केवळ थातुरमातुर माती टाकून नाही रस्ते पक्के मजबूत करावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
तालुक्यातील सर्वच नादुरुस्त मार्गांची तातडीने दुरुस्ती करा - सचिन शेंडे
भारतीय जनता युवा मोर्चा ने दिले निवेदन
राजुरा तालुक्यातील रामपुर-गोवरी-साखरी-पोवणी-कवठाळा राज्य मार्गाचे शासनाच्या हायब्रीड अम्युनिटी निधी अंतर्गत नुकतेच काम करण्यात आले होते. काम पुर्ण होवून अवघा काहीच कालावधी झाला असतांना रस्ता पुर्ण उखडलेला आहे. या मार्गावर अनेक गावे असून गावातील नागरिकांसोबतच वेकोलि कर्मचारीसुध्दा मोठ्या प्रमाणात या मार्गावरून नियमीत ये-जा करीत असतात. मात्र रस्ता पूर्णतः उखडला असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. शासनाचा करोडो रुपयांचा निधी खर्चून या रस्याचे बांधकाम करण्यात आले मात्र प्रशासनाचा निष्काळजीपणा व कंत्राटदाराची निकृष्टता यामुळे अवघ्या काहीत दिवसातच रस्त्याचे तिन-तेरा वाजले आहे. या मार्गावर रोज अपघाताची मालीका सुरू असून हे सर्व अपघात खड्डेमय व दबलेल्या रस्यामुळे होत आहे. सदर रस्ता बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार व संबंधीत अभियंत्यावर कायदेशीर कारवाई होणे करण्याच्या मागणीचे निवेदन आज दि. २१ जुलै ला उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग राजुरा यांना व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग १ चंद्रपूर यांना देण्यात आले. निवेदनाची प्रतिलिपी विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, मा. जिल्हाधिकारी, माजी आमदार अँड. संजय धोटे, तहसीलदार राजुरा, पोलीस निरीक्षक राजुरा यांना देण्यात आली आहे. सदर मार्गाची तातडीने एका आठवड्यात दुरुस्ती करा अन्यथा आठवडाभरानंतर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा हि देण्यात आला. निवेदन देतेवेळी भाजयुमो राजुरा तालुका अध्यक्ष सचिन शेंडे, ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री संदीप पारखी, संदीप गायकवाड, कळमना ग्रापं सदस्य दीपक झाडे, भाजयुमो सास्ती अध्यक्ष अरुण लोहबडे, रत्नाकर पायपरे, कैलास कार्लेकर, संदीप मडावी, जहिरले काका रामपूर, नितीन पावडे इत्यादी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.