चंद्रपूर -
कोविड-१९ च्या पार्श्वभूमिवर शासनाने दिलेल्या निर्देशानुसार ज्या ठिकाणी सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे त्या मंडळांच्या मागणीनुसार महावितरणकडून तात्पुरती वीजजोडणी देण्यात येत आहे. तसेच या तात्पुरत्या जोडणीच्या वीजवापरासाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे.
गणेशोत्सवाच्या कालावधीत पावसाची शक्यता असल्याने गणेश मंडळांनी संभाव्य धोके टाळण्यासाठी वीजयंत्रणेची योग्य काळजी घ्यावी. मंडपाची व रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करून घेणे आवश्यक आहे. गणेश उत्सव मंडपातील वीजयंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. मंडळाच्या अंतर्गत वायरचे इन्सूलेशन खराब झाल्यास अशा वायर्समधून मंडपाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये किंवा ओल्या वस्तुंमध्ये विद्युत प्रवाह येऊ शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी वायर्सचे जोड काढून टाकावेत किंवा जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या इन्सूलेशन टेपने जोड देण्यात यावा. स्वीचबोर्डच्या मागे प्लायवूड किंवा लाकडी फळी लावल्याची खात्री करून घ्यावी.
गणेश मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. काही कारणास्तव वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीजप्रवाह लघुदाब वीजवाहिनीमध्ये प्रवाहित होतो व त्यातून जीवघेण्या अपघाताची शक्यता निर्माण होते. संततधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे मंडपातील वीजयंत्रणेसह सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या लाईटिंगचे वायर्स खाली झुकलेले नाही किंवा विस्कळीत झालेले नाहीत याची दैनंदिन तपासणी करावी.
गणेशोत्सवाच्या काळात मंडपात शॉर्टसर्कीट होणे, विद्युत वायरिंगमध्ये बिघाड होणे आदी कारणांमुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधीत क्षेत्रातील महावितरणचे अभियंता व कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत. तसेच तक्रारींसाठी किंवा तातडीच्या मदतीची गरज भासल्यास 24 तास उपलब्ध असलेले 1912 किंवा 18001023435 किंवा 18002333435 या क्रमांकावर तसेच 7875761195 (चंद्रपूर मंडळातील ग्राहकांनी ) व 7875009338 (गडचिरोली मंडळातील ग्राहकांनी ) संपर्क साधावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.