- कोव्हीड पश्चात 16796 जणांना कॉल तर 21193 जणांना एसएमएस
- लक्षणे आढळताच उपचार घेण्याचे आवाहन
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर -
दि. 31 मे : कोविडचा प्रादुर्भाव हा एकमेकांच्या संपर्कात आल्याने होत असला तरी कोविड पश्चात होणारा म्युकरमायकोसीस हा आजार संसर्गजन्य नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता लक्षणे आढळताच त्वरीत वैद्यकीय उपचार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. विशेष म्हणजे कोव्हीडमधून बरे झालेल्या 16796 जणांना कॉल तर 21193 जणांना म्युकरमायकोसीस बाबत जिल्हा प्रशासनाच्यावतीने एसएमएस करण्यात आला आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रसाराबाबत नागरिकांच्या शंकांचे व समस्यांचे समाधान करण्यासाठी आणि कार्यवाहीत सुसूत्रता आणण्यासाठी कॉल सेंटर स्थापन करण्यात आले आहे. या कॉल सेंटरच्या माध्यमातून कोरोना आजारातून बरे झालेल्या आतापर्यंत 16 हजार 796 रुग्णांना कॉल करण्यात आले आहे. त्यापैकी 36 लोकांमध्ये म्युकरमायकोसीस सदृश्य लक्षणे आढळून आलेली असून सदर रुग्णांना उपचारासाठी डॉ.वासाडे रुग्णालय व क्राईस्ट रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काही रुग्णांवर शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसीस आजाराचे 69 रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 56 रुग्णांवर उपचार सुरू असून 12 रुग्ण या आजारातून बरे झाले. तर एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसीस आजाराबाबतची माहिती, लक्षणे व इतर आरोग्यविषयक माहीती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय सुचना केंद्रातून माहे मार्च ते एप्रिल या कालावधीत 21 हजार 193 नागरिकांना एसएमएस पाठविण्यात आलेले आहे.
म्युकरमायकोसीसची लक्षणे :
या रोगाची लक्षणे पुढीलप्रमाणे आहे. चेह-याचे स्नायू दुखणे, चेह-यावर बधिरपणा येणे, अर्धशिशी (डोक्याची एक बाजू दुखणे), नाक चोंदणे, नाकावर सूज येणे, एका नाकपुडीतून रक्तस्त्राव, काळपट स्त्राव येणे, चेहरा अथवा डोळ्यावर सूज येणे, एक पापणी अर्धी बंद होणे, डोळा दुखणे, वरच्या जबड्याचे दात दुखणे किंवा हलू लागणे, अस्पष्ट दिसणे, ताप येणे.
काय करावे (प्रतिबंधात्मक उपाय) :
रक्तातील साखरेवर काटेकोरपणे नियंत्रण ठेवणे, कान, नाक, घसा, नेत्र व दंत तज्ज्ञाकडून एका आठवड्यानंतर तपासणी करणे, वरील लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क करणे, डॉक्टरांनी सांगितल्यापेक्षा जास्त दिवस स्टिरॉईड न घेणे, टूथब्रश / मास्क वरचेवर बदलणे, दिवसातून एकदा गुळण्या करणे, वैयक्तिक व परिसरातील स्वच्छता ठेवणे, जमिनीखाली लागणा-या भाज्या नीट स्वच्छ धुवून खाव्यात. मातीत काम करतांना व खतांचा वापर करतांना पूर्ण बाह्यांचा शर्ट, फुलपॅन्ट, हातात ग्लोव्हज घालावे. तसेच नाकातोंडावर मास्क घालावा.
हे करू नये :
छोट्या छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. घरगुती उपायांचा पर्याय निवडू नये. वैद्यकीय सल्ल्यानेच स्टिरॉईड व इतर औषधांचे सेवन करावे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.