Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: लसीकरण उदघाटन कार्यक्रम - वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जि.प. सदस्य मेघाताई नलगे यांचे वर गुन्हा दाखल जि.प. सदस्य मेघा नलगे यांना तातडीने अटक करा - बिरसा क्रांती दलाची मागणी राजकीय द्वेषातून तक्रा...

  • जि.प. सदस्य मेघाताई नलगे यांचे वर गुन्हा दाखल
  • जि.प. सदस्य मेघा नलगे यांना तातडीने अटक करा - बिरसा क्रांती दलाची मागणी
  • राजकीय द्वेषातून तक्रार - महिला काँग्रेसचे निवेदन

अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा तालुक्यातील देवाडा प्राथमिक स्वास्थ्य केंद्रातील लसीकरण कार्यक्रमाचे उदघाटन आपल्या सोईच्या वेळेनुसार न करता परस्पर उरकून टाकले, म्हणुन काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्या मेघा नलगे यांनी देवाडा प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात येऊन आपल्याला जातिवाचक शिवीगाळ व धमकी दिल्याची तक्रार देवाडा प्राथमिक स्वास्थ्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नागनाथ डुडूले यांनी राजुरा पोलिस ठाण्यात केली. या तक्रारीवरुन राजुरा पोलिसांनी दिनांक 16 मार्चला रात्री दोन वाजता जिल्हा परिषद सदस्य मेघा नलगे यांचे विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश नगराळे यांनी देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरण सुरू करण्याची सूचना देऊन स्थानिक नेत्यांचे हस्ते शुभारंभ करण्याचे डॉ.नागनाथ डुडूले यांना सांगितले. वरिष्ठांच्या सूचनेनुसार शुभारंभ कार्यक्रम दिनांक 13 मार्चला आयोजित करण्यात आला. यासाठी जि.प. सदस्य मेघा नलगे, जि.प. सदस्य डॉ. नामदेव करमनकर, राजुरा पंचायत समिती सभापती मुमताज जावेद, माजी पंचायत समिती सदस्य जमीर शेख,  सरपंच लक्ष्मी पंधरे, उपसरपंच जावेद पटेल यांना पाचारण केले. मात्र मेघा नलगे व मुमताज जावेद या राजुरा येथे कार्यक्रमात व्यस्त असल्याने पोहोचू शकल्या नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी फोन करूनही त्या न आल्याने अखेर बाकी पाहुण्यांच्या उपस्थितीत जेष्ठ नागरिकांना कोविड लस देऊन लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. 

दिनांक 16 मार्चला दुपारी चार वाजता मेघा नलगे, मुमताज जावेद, उपसरपंच जावेद पटेल व अन्य दोन महिला असे पाच जण डॉ. नागनाथ डुडूले यांच्या केबिन मध्ये जावुन रुग्ण तपासत असतांना त्यांना आपल्या शिवाय उदघाटन कार्यक्रम घेतलाच कसा, असा प्रश्न विचारून त्यांना जातीविषयक शिवीगाळ करीत धमकी देत चप्पल उगारली. यानंतर गावातून काही लोक आले आणि ते मेघा नलगे व ईतर लोकांना घेऊन गेले. यानंतर डॉ.नागनाथ डुडूले यांनी सर्व रुग्ण तपासणी झाल्यानंतर रात्री दहा वाजता राजुरा पोलिस ठाणे येथे जाऊन तक्रार दिली. अखेर रात्री दोन वाजता राजुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

जि.प. सदस्य मेघा नलगे यांच्या विरोधात राजुरा पोलिसांनी भादंवि कलम 186, 504, 506 व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा या कलमानुसार गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास नांदा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक करीत आहेत.

जि.प. सदस्य मेघा नलगे यांना तातडीने अटक करा - बिरसा क्रांती दलाची मागणी
देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नागनाथ डुडूले यांना शासकीय कामात असतांना शिवीगाळ, धमकी देणार्‍या जिल्हा परिषद सदस्य मेघा नलगे यांना तातडीने अटक करावी आणि डॉक्टरांच्या तक्रारीनुसार आणखी महत्वाच्या कलमान्वये गुन्हे दाखल करावे, अशी मागणी बिरसा क्रांती दलाने चंद्रपूर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांचेकडे केली आहे. 

डॉ. नागनाथ डुडूले हे गेल्या वर्षापासुन देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी असून ते चांगली सेवा देत आहेत. आधीच ग्रामीण व आदिवासी भागात डॉक्टर्स वैद्यकीय सेवा देण्यासाठी नाखूश असतात. आदिवासी बहुल असलेल्या या भागात चांगले डॉक्टर लाभल्याने येथील जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळत आहे. मात्र केवळ आपल्या प्रतिष्ठेसाठी राजकिय नेते अशा अधिकाऱ्यांना त्रास देतात, हे दुर्दैव आहे असे मत चंद्रपूर जिल्हा बिरसा क्रांती दलाचे उपजिल्हा अध्यक्ष संतोष कुळमेथे यांनी व्यक्त केले आहे. भादंवि कलम 353 कलमानुसार ही गुन्हा नोंदवावा आणि आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणावरून राजुरा येथे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

राजकीय द्वेषातून तक्रार - महिला काँग्रेसचे निवेदन
देवाडा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य मेघा नलगे यांच्या विरुद्ध केलेली तक्रार राजकीय द्वेषातून केली असल्याचे निवेदन राजुरा तालुका महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चंद्रपूर पोलिस अधीक्षकांना दिले आहे.

देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरण सुरू झाल्याने जि.प. सदस्य मेघा नलगे व पंचायत समिती सभापती मुमताज जावेद व अन्य कार्यकर्त्यां पाहणी करायला गेल्या होत्या. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी उलटसुलट उत्तरे दिली. या प्रकरणाची चौकशी करून न्याय देण्याची मागणी राजुरा पंचायत समिती सभापती मुमताज जावेद, कविता उपरे, संध्या चांदेकर, निर्मला कुळमेथे, कुंदा जेनेकर, नंदा गेडाम, कामिनी उईके, अर्चना गर्गेलवार, सुमित्रा कुचनकर यांनी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक यांचेकडे केली आहे. 


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top