Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नवरात्रौत्सव साध्या पद्धतीने व शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून साजरा करावा : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सार्वजनिक नवरात्रौत्सव साजरा करण्याच्या मार्गदर्शक सूचना जारी वाचा सविस्तर... मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी चंद्रपूर - कोविड- 19 मुळे उद्भवल...

  • सार्वजनिक नवरात्रौत्सव साजरा करण्याच्या मार्गदर्शक सूचना जारी
  • वाचा सविस्तर...
मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर -

कोविड- 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा नवरात्रौत्सव, दुर्गापूजा, दसरा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी महाराष्ट्र शासनाने मार्गदर्शक सूचनेचे एक परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सार्वजनिक नवरात्रौत्सव अत्यंत साध्या पद्धतीने व शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

अशा आहेत मार्गदर्शक सुचना:
सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी महापालिका, स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.

कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.

या वर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मुर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी. देवीच्या मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट व घरगुती देवीच्या मुर्तीची उंची 2 फूटांच्या मर्यादेत असावी.

या वर्षी शक्यतो पारंपारिक देवीच्या मुर्तीऐवजी घरातील धातू  संगमरवर आदी मुर्तीचे पुजन करावे. मुर्ती शाडूची, पर्यावरण पुरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.

नवरात्रौत्सवाकरिता वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी.

गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.

आरती, भजन, किर्तन या अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

देवीच्या मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारिरीक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटायजर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरीष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती देवीच्या मुर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये.

महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादीच्या मदतीने कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी. तसेच नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय मुर्ती स्विकृती केंद्राची व्यवस्था करावी व याबाबत जास्तीत जास्त प्रसिध्दी देण्यात यावी.

मंडपात एकावेळी पाच पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपांमध्ये खाद्यपदार्थ अथवा पेय पानाची व्यवस्था करण्यास मनाई असेल.विसर्जनाच्या तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्रात असेल तर, मुर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल.

दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून प्रतिकात्मक स्वरुपाचा असावा. रावण दहनाकरिता आवश्यक तेव्हा किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील. प्रेक्षक बोलवू नयेत. त्यांना फेसबुक इत्यादी समाज माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे बघण्याची व्यवस्था करावी.

कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top