Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजुरा येथे सुनील पोटे यांच्या आंबील काव्यसंग्रहाचे प्रकाशन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा -   झाडीबोली साहित्य ग्रामीण विभागाचे वतीने आयोजित कार्यक्रमात कवी सुनील पोटे यांच्या पहिल्य...

विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -  
झाडीबोली साहित्य ग्रामीण विभागाचे वतीने आयोजित कार्यक्रमात कवी सुनील पोटे यांच्या पहिल्या आंबील काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. संत नगाजी महाराज सभागृहात आयोजित ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक आचार्य ना.गो.थुटे होते. उद्घाटक समाज कल्याण चंद्रपूर उपायुक्त विजय वाकुलकर हे होते, भाष्यकार म्हणून कवी अरूण झगडकर व कवी प्रशांत भंडारे, प्रमुख अतिथी लख्खनसिंह कटरे जेष्ट साहित्यिक गोंदिया, परशुराम खुणे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर आदींची उपस्थिती होती. प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक सुनील पोटे यांनी केले.
प्रास्ताविक मनोगतात सुनील पोटे यांनी काव्यसंग्रहाच्या निर्मिती बाबतच्या प्रेरणा, झाडीबोलीबाबत असलेली आस्था व ती टिकविण्याची आवश्यकता याबाबत प्रकाश टाकला. प्रमुख भाष्यकार अरूण झगडकर याप्रसंगी म्हणाले, सुनील पोटे यांच्या आंबील ह्या काव्यसंग्रहातून झाडीपट्टीतील समाजमनाचे अस्सल दर्शन घडते. झाडीबोली शब्दांमुळे आंबीलचे आंतरिक सौंदर्य वाढले असून त्यात झाडीपट्टीतील प्राचीन संस्कृतीचे विविध घटकांचे सौंदर्य दिसून येतात. यात स्वनिष्ठ जाणिवांचे प्रभावीपणे लेखन झाले असल्याचे ते म्हणाले. दुसरे भाष्यकार कवी प्रशांत भंडारे यांनी वेगवेगळ्या बोली शब्दांवर प्रकाश टाकत  म्हणाले, बोलीभाषा जीवंत आहे तोपर्यंत मराठी भाषा समृद्ध होत जाणार आहे. त्यासाठी नवोदित साहित्यिकांनी बोली भाषेत नवीन साहित्य निर्मिती करावी असे आवाहन केले. बंडोपंत बोढेकर यांनी झाडीबोली साहित्य मंडळांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा मांडला. लख्खनसिंह कटरे, परशुराम खुणे यांनी समयोचित विचार व्यक्त करून पोटे यांच्या लेखन कार्यास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात झाडीबोली साहित्य मंडळातर्फे आयोजित झाडीबोली विशेष प्रावीण्य पुरस्कार विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह पुस्तके देऊन लख्खनसिंह कटरे, परशुराम खुणे, उत्कृष्ट चित्रकार बंशी कोठेवार, झाडीचा कवी मुरलीधर खोटेले, आनंदराव बावणे गुरूजी यांना सन्मानित करण्यात आले.

दुसऱ्या सत्रात  निमंत्रित कवी संमेलन जेष्ट गजलकार दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि कवयित्री अँड. सारिका जेनेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यात संतोष मेश्राम, भावना खोब्रागडे, नेताजी सोयाम, लक्ष्मण खोब्रागडे, नागेंद्र नेवारे, अर्जुमन शेख, सुनील कोवे, दुशांत निमकर, शितल कर्णेवार, अरुण घोरपडे, नेतराम इंगळकर, संगीता बांबळे, संतोष कुमार उईके, किशोर कवठे, प्रविण तुराणकर, माधव कौरासे, हेमा लांजेवार, योगेश धोडरे तसेच इतर साहित्य प्रेमीनी आपल्या काव्यरचनांचे सादरीकरण केले. 
संचालन रामकृष्ण चनकापुरे आणि आभार अर्चना जुनघरे यांनी मानले तर कवी संमेलनाचे सूत्रसंचालन कवी विरेनकुमार खोब्रागडे यांनी केले तर आभार कवी प्रदिप मडावी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामकृष्ण मांडवकर, प्रा.गणेश लोहे, विनोद ढोबे, रामरतन चाफले यांनी अथक परिश्रम घेतले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top