आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
नागपूर -
त्याने परिचारकचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पण, त्याला 'डॉक्टर' बनावेसे वाटले. मग काय, डॉक्टरचा 'ऍप्रन' घालून तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) रुग्णांची तपासणीही करायला लागला. दोन महिने त्याची डॉक्टरकी चालली. मात्र, त्याचे बिंग फुटले. अजनी पोलिसांनी त्याला अटकेचे इंजेक्शन दिले.
सिद्धार्थ जैन (वय २३, रा. महाल, मूळ रा. अहमदाबाद, गुजरात) असे अटकेतील तोतयाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थने परिचारकाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्याची आई घरी खानावळ चालविते. दोन महिन्यांपासून तो मेडिकलमधील विविध वॉर्डांत रुग्णांची तपासणी करायचा. निवासी डॉक्टरांनी विचारणा केली असता तो 'सीएमओ' असल्याचे सांगायचा तर सीएमओने विचारणा केली असता निवासी डॉक्टर असल्याचे सांगायचा. चार दिवसांपूर्वी येथील डॉक्टरांना त्याच्यावर संशय आला. डॉक्टरांनी अजनी पोलिसांना माहिती दिली. तोपर्यंत सिद्धार्थ हा मेडिकलमधून पसार झाला. त्यानंतर पोलिस त्याच्यावर पाळत ठेऊन होते. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास सिद्धार्थ पुन्हा मेडिकलमध्ये आला. येथील डॉक्टरांनी त्याला पकडले, अजनी पोलिसांना माहिती दिली. अजनीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, महिला पोलिस उपनिरीक्षक संध्या सोमनकर, हेडकॉन्स्टेबल राजू चौधरी यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी सिद्धार्थवर तोतयागिरीचा गुन्हा दाखल करून अटक केली.
कोव्हिड वॉर्डातही सक्रिय
सिद्धार्थ दोन महिन्यांत १२ ते १५ वेळा मेडिकलमध्ये आला. त्याने विविध वॉर्डांसह चक्क कोव्हिड वॉर्डातील रुग्णांचीही तपासणी केली. काही रुग्णांना त्याने औषधेही लिहून दिल्याची माहिती आहे. त्याने कोणाला कोणती औषधी लिहून दिली, याची माहिती पोलिस घेत आहेत.
स्वप्न बनली हौस...
सिद्धार्थला डॉक्टर बनायचे होते. मात्र, परिस्थितीमुळे त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे त्याने परिचारकाचा अभ्यासक्रम केला. डॉक्टर बनण्याची हौस भागविण्यासाठी तो डॉक्टरच्या वेशभूषेत मेडिकलमध्ये वावरत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.