आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २३ नोव्हेंबर २०२६) -
चंद्रपूर (दि. २३ नोव्हेंबर २०२६) -
पोंभुर्णा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) कार्यरत महिला तासिका तत्त्वावरील निदेशकाच्या पाच महिन्यांच्या मानधनाच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. तडजोडीनंतर २५ हजार रुपये स्वीकारताना कनिष्ठ लिपिक नरेंद्र मलीक यांना पंचांसमक्ष पकडण्यात आले. या प्रकरणात प्राचार्य कल्पना संजय खोब्रागडे यांचाही सहभाग असल्याचा आरोप असून, दोघांनाही एसीबीने ताब्यात घेतले आहे.
एसीबीच्या प्रसिद्धिपत्रकानुसार, महिला तक्रारदाराने २१ नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारदार या पोंभुर्णा आयटीआयमध्ये तासिका तत्त्वावर शिल्प निदेशक म्हणून कार्यरत आहेत. मे, जून, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२६ या पाच महिन्यांचे मानधन नोव्हेंबरमध्ये मिळाले होते. हे मानधन काढून दिल्याच्या मोबदल्यात प्राचार्य कल्पना खोब्रागडे यांनी कनिष्ठ लिपिक नरेंद्र मलीक यांच्या माध्यमातून ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. २२ नोव्हेंबर रोजी पंचांसमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीदरम्यान ३० हजार रुपयांची मागणी झाल्याचे एसीबीने नमूद केले. त्यानंतर तडजोडीअंती २५ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. ही रक्कम २३ नोव्हेंबर रोजी लिपिक नरेंद्र मलीक यांच्याकडे देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार एसीबीने पोंभुर्णा आयटीआयमध्ये सापळा रचला. यावेळी नरेंद्र मलीक यांनी पंचांसमक्ष २५ हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने लिपिक नरेंद्र मलीक आणि प्राचार्य कल्पना संजय खोब्रागडे या दोघांनाही ताब्यात घेतले. या प्रकरणी पोंभुर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एसीबीने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक तेजराम मेश्राम यांनी सापळा कारवाईचे नेतृत्व केले. या पथकात पोलीस निरीक्षक प्रशांत केदार, सहाय्यक फौजदार मनोज रामटेके, पोलीस हवालदार हिवराज नेवारे, रविकांत इंगळे, पोलीस शिपाई अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, प्रदीप ताडाम, महेश माहुरपवार, ज्ञानेश्वर डोकळे, सचिन गजभिये, महिला पोलीस शिपाई सीमा झाडे, चालक पोलीस शिपाई सतीश सिडाम आणि चालक पोलीस शिपाई संदीप कवरासे यांनी सहभाग घेतला. लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध नागरिकांनी निर्भयपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन विभागाने केले आहे.
#ChandrapurNews #Pombhurna #ACBChandrapur #BriberyCase #AntiCorruptionBureau #ChandrapurACB #ITI Pombhurna #MaharashtraNews #CorruptionNews #GovernmentOffice #ChandrapurPolice #VidarbhaNews #AamchaVidarbha #लाचलुचपतप्रतिबंधकविभाग #पोंभुर्णा #चंद्रपूर #लाचप्रकरण #एसीबीकारवाई #शासकीयऔद्योगिकप्रशिक्षणसंस्था

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.