आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०१ ओक्टोबर २०२६) -
सार्वजनिक गणेशोत्सव व विसर्जन सोहळा २०२६ हा चंद्रपूर जिल्ह्यात शांततेत, सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात पार पडल्याच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध घटकांचा चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गौरव करण्यात आला. पोलीस अधीक्षक कार्यालय, चंद्रपूर यांच्या वतीने ३० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी पोलीस मुख्यालय, चंद्रपूर येथे सन्मान व प्रशस्तीपत्र वाटप सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पोलीस अधीक्षक आयुष नोपानी (भा.पो.से.) यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त अकनुरी नरेश (भा.प्र.से.), अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. गणेशोत्सवादरम्यान चंद्रपूर शहर व जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजना, नागरिकांचे सहकार्य तसेच सामाजिक जनजागृतीच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त अकनुरी नरेश यांनी आपल्या मनोगतात पोलीस प्रशासन, महानगरपालिका आणि नागरिकांमध्ये राहिलेल्या उत्तम समन्वयामुळे यंदाचा गणेश विसर्जन सोहळा कोणतीही दुर्घटना न घडता सुलभतेने पार पडल्याचे सांगितले. समाजहितासाठी प्रशासन आणि नागरिकांमधील हा समन्वय भविष्यातही कायम राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश उत्सवादरम्यान सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा आहे. गणेशोत्सवाचे पावित्र्य जपत सामाजिक भान वाढविणे आणि तरुणाईला सकारात्मक दिशा देणे, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चंद्रपूर जिल्ह्यातील गणेश मंडळे, शांतता समिती सदस्य, पोलीस मित्र आणि जागरूक नागरिकांनी दाखविलेली शिस्त तसेच प्रशासनाला दिलेले सहकार्य कौतुकास्पद असल्याचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी सांगितले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी दिलेला सहभाग पोलिसांचे मनोधैर्य वाढविणारा ठरल्याचेही त्यांनी नमूद केले.
अमली पदार्थविरोधी जनजागृतीला प्राधान्य
चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गणेशोत्सवादरम्यान ‘अमली पदार्थ विरोधी जनजागृती, ध्वनी प्रदूषण नियंत्रण आणि महिला सुरक्षा’ या विषयांवर विशेष देखावा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सामाजिक संदेश प्रभावीपणे मांडणाऱ्या गणेश मंडळांना रोख पारितोषिके आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत
- हिवरपुरी बाल गणेश मंडळ, चंद्रपूर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. मंडळाला २१ हजार रुपये रोख पारितोषिक व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
- श्री विठ्ठल मंदिर वार्ड गणेश मंडळ, चंद्रपूर यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. मंडळाला ११ हजार रुपये रोख पारितोषिक व सन्मानपत्र देण्यात आले.
- श्री नवयुवक बाल गणेश मंडळ, दत्तनगर, चंद्रपूर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. मंडळाला ५ हजार १०० रुपये रोख पारितोषिक व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
नियमांचे पालन करणाऱ्या गणेश मंडळांचाही गौरव
गणेशोत्सवादरम्यान नियमांचे पालन करून शांततामय वातावरणात उत्सव साजरा करणाऱ्या विविध गणेश मंडळांचा पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला. पोलीस ठाणे चंद्रपूर शहर, रामनगर, पडोली, दुर्गापूर, घुग्घुस, वरोरा, भद्रावती आणि बल्लारपूर यांच्या हद्दीतील विविध गणेश मंडळे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
विसर्जन व्यवस्थेत मनपाचे योगदान
गणेश विसर्जनाच्या काळात विसर्जन घाटांवरील स्वच्छता, प्रकाश व्यवस्था आणि विसर्जनाचे नियोजन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने महत्त्वाची भूमिका बजावली. या योगदानाबद्दल चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त अकनुरी नरेश तसेच मनपा पथकाचा कृतज्ञता प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
महावितरणचा अखंडित वीजपुरवठ्यासाठी सन्मान
गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीदरम्यान मिरवणूक मार्गावर २४ तास अखंडित आणि सुरक्षित वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याची दखल घेण्यात आली. याबद्दल महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
डी.जे. असोसिएशनचाही गौरव
मा. न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनी मर्यादा अर्थात डेसिबल लिमिट आणि निर्धारित वेळेचे काटेकोर पालन करून उत्सवात सहकार्य केल्याबद्दल डी.जे. व साऊंड सिस्टिम असोसिएशनचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला. ध्वनी प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने नियमांचे पालन करण्यासाठी दिलेल्या सहकार्याची पोलिस प्रशासनाने दखल घेतली.
शांतता समिती, पोलीस मित्र आणि इको-प्रोचा सन्मान
गणेशोत्सवाच्या काळात बंदोबस्तासाठी प्रत्यक्ष मदत, नागरिकांमध्ये समन्वय आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी योगदान देणाऱ्या शांतता समिती सदस्य आणि पोलीस मित्रांचाही यथोचित गौरव करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील निवडक पोलीस मित्र आणि शांतता समिती सदस्यांना कृतज्ञता प्रशस्तीपत्र देण्यात आले. तसेच सामाजिक कार्यातून उत्सव काळात सहकार्य करणाऱ्या इको-प्रो संस्था, चंद्रपूरच्या सदस्यांचाही गौरव करण्यात आला.
प्रशासन आणि नागरिकांच्या समन्वयाचा संदेश
गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखणे, ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे, वाहतूक आणि विसर्जन व्यवस्था सुरळीत ठेवणे तसेच नागरिकांमध्ये सामाजिक सलोखा निर्माण करणे यासाठी पोलीस प्रशासनासोबत विविध शासकीय यंत्रणा, गणेश मंडळे, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम केले. यंदाच्या गणेशोत्सवात या समन्वयाचे सकारात्मक परिणाम दिसून आले. पुरस्कार व सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाने केवळ गणेश मंडळांचे कौतुक न करता उत्सवाच्या यशस्वी आयोजनामागे काम करणाऱ्या विविध घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि नागरिकांची उपस्थिती
या सोहळ्यास परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी ठाणेदार, भद्रावती तसेच रामनगर, दुर्गापूर, पडोली, घुग्घुस, वरोरा आणि बल्लारपूर पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक, सर्व पोलीस अंमलदार, गणेश मंडळांचे पदाधिकारी, शांतता समिती सदस्य, पोलीस मित्र, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशोत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व घटकांचे आभार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
#ChandrapurNews #ChandrapurPolice #ChandrapurGaneshotsav #Ganeshotsav2026 #ChandrapurGaneshotsav2026 #ChandrapurCity #Chandrapur #GaneshUtsav #GaneshMandals #GaneshVisarjan #PoliceDepartment #AyushNopani #GaneshotsavAward #SocialAwareness #DrugAwareness #NoisePollution #WomenSafety #ShantataSamiti #PoliceMitra #EcoProChandrapur #MSEDCL #ChandrapurMunicipalCorporation #VidarbhaNews #AamchaVidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.