40 हून अधिक उद्योजकांना शासकीय खरेदीचे प्रशिक्षण
शासनाच्या 100 टक्के खरेदी प्रक्रियेत GeM पोर्टलचे वाढते महत्त्व अधोरेखित
आमचा विदर्भ (वृत्तसेवा)
अमरावती (दि. 01 ऑगस्ट 2026) -
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना शासकीय खरेदी प्रक्रियेत अधिक प्रभावीपणे सहभागी करून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या RAMP (Raising and Accelerating MSME Performance) योजनेअंतर्गत MCED महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, अमरावती आणि MSSIDC मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने "GeM पोर्टलवरील क्षमतावर्धन एक दिवसीय मोफत कार्यशाळा" हॉटेल रामगिरी इंटरनॅशनल, अमरावती येथे उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत जिल्ह्यातील 40 हून अधिक MSME उद्योजक, स्टार्टअप आणि महिला उद्योजकांनी सहभाग नोंदवत शासकीय खरेदी प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योग सहसंचालक तथा जिल्हा उद्योग केंद्र, अमरावतीचे निलेश निकम उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, अमरावतीचे नेत्रदीप चौधरी यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक व तांत्रिक तज्ज्ञ म्हणून डायरेक्टर, टेंडर गुरु फाउंडेशन, पुणेचे हर्षद बार्गे यांनी दिवसभर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले. यावेळी MCED आणि जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी, MSSIDC चे प्रतिनिधी तसेच विविध उद्योग क्षेत्रातील उद्योजक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत Government e-Marketplace (GeM) हे केंद्र व राज्य शासनाच्या सर्व प्रकारच्या खरेदीसाठी अधिकृत पोर्टल असल्याचे सांगण्यात आले. शासनाला थेट उत्पादने व सेवा पुरविण्यासाठी प्रत्येक MSME उद्योगाने GeM पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
प्रकल्प अधिकारी नेत्रदीप चौधरी यांनी मार्गदर्शन करताना "वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट" या संकल्पनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी GeM पोर्टल अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. स्थानिक उद्योजकांनी आपल्या उत्पादनांची थेट शासनाला विक्री करून व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी या व्यासपीठाचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
तांत्रिक सत्रात डायरेक्टर हर्षद बार्गे यांनी GeM पोर्टलवरील नोंदणी प्रक्रिया, उद्यम नोंदणी, पॅन, जीएसटी व बँक खाते लिंक करणे, उत्पादनांचा कॅटलॉग तयार करणे, HSN कोड, किंमत निश्चिती, सरकारी टेंडर शोधणे, ऑनलाइन बोली प्रक्रिया, ई-इनव्हॉइस, पेमेंट प्रणाली तसेच 10 दिवसांत देयक मिळण्याची प्रक्रिया याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन केले. याशिवाय GeM पोर्टलचे फायदे, पारदर्शक खरेदी प्रक्रिया, मध्यस्थांशिवाय व्यवहार आणि कमी कागदपत्रांमुळे होणारी सुलभता याविषयीही माहिती देण्यात आली. उपस्थित उद्योजकांच्या विविध शंकांचे समाधानही यावेळी करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात उद्योग सहसंचालक निलेश निकम यांनी शासनाची जवळपास संपूर्ण खरेदी प्रक्रिया आता GeM पोर्टलद्वारे होत असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील लघु व मध्यम उद्योगांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा तसेच जिल्हा उद्योग केंद्रामार्फत GeM नोंदणीसाठी सर्वतोपरी सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. GeM मुळे अमरावतीतील उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावरील बाजारपेठ उपलब्ध होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या समारोपावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन रश्मी देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन मुकुल चौधरी यांनी MCED अमरावतीच्या वतीने केले. GeM पोर्टलवर नोंदणी पूर्ण केलेल्या उद्योजकांना प्रमाणपत्रांचे वितरण करून कार्यशाळेची सांगता करण्यात आली.
#Amravati #MSME #GeMPortal #GovernmentEMarketplace #RAMPYojana #MCED #MSSIDC #DigitalIndia #StartupIndia #WomenEntrepreneurs #OneDistrictOneProduct #GovernmentTender #MSMEIndia #BusinessNews #MaharashtraNews #Entrepreneurship #IndustrialDevelopment #SkillDevelopment #AmravatiNews #MakeInIndia

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.