Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गावठाण जमिनींची ड्रोन मोजणी तातडीने करा; अन्यथा मुंडण आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तीन महिन्यांत आखीव पत्रिका व पी.आर. कार्ड देण्याची मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख महिला आघाडी सौ. मिनलताई आत्राम यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडण...
तीन महिन्यांत आखीव पत्रिका व पी.आर. कार्ड देण्याची मागणी
शिवसेना जिल्हा प्रमुख महिला आघाडी सौ. मिनलताई आत्राम यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
चंद्रपूर / भद्रावती (दि. २० ऑगस्ट २०२६) -
        भद्रावती शहरातील गवराळा वॉर्डासह विविध नऊ वॉर्डांमधील गावठाण जमिनींची ड्रोनद्वारे तातडीने मोजणी करून नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड (पी.आर. कार्ड) व आखीव पत्रिका उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मिनलताई आत्राम यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, चंद्रपूर तसेच जमाबंदी आयुक्त तथा संचालक, भूमी अभिलेख कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडेही सादर करण्यात आली आहे.

         भद्रावती शहरातील गवराळा वॉर्ड तसेच विविध नऊ वॉर्डांमध्ये मोठ्या प्रमाणात गावठाण क्षेत्र आहे. या परिसरातील नागरिक गेल्या अनेक पिढ्यांपासून, काही ठिकाणी १०० वर्षांहून अधिक काळापासून वास्तव्य करीत आहेत. मात्र त्यांच्या मालकीच्या जमिनी, घरे व मिळकतींची अधिकृत नोंद शासनाच्या अभिलेखात उपलब्ध नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

        आखीव पत्रिका किंवा प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना त्यांच्या मालमत्तेचा अधिकृत पुरावा सादर करताना अडचणी येत आहेत. परिणामी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासही अडथळे निर्माण होत आहेत. विशेषतः प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळविताना नागरिकांना अडचणी येत असून, मुलांचे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांअभावी नागरिकांना विविध कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागत असल्याचे आत्राम यांनी निवेदनात म्हटले आहे.

        केंद्र शासन पुरस्कृत स्वामित्व योजनेअंतर्गत गावठाणातील घरे व जमिनींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण आणि मोजणी करण्याची महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून गावठाणातील मिळकतधारकांच्या मालमत्तांचे अचूक मोजमाप करून त्यांना मालकी हक्काशी संबंधित अधिकृत दस्तऐवज उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील गावठाण क्षेत्रातील मिळकतींचे मोजमाप करण्यात येणार असतानाही भद्रावती शहरातील गावठाण मोजणीच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

        दरम्यान, ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा प्रशासनाने ड्रोनद्वारे मोजणीसाठी जुलै २०२५ मध्ये एनओसी (नाहरकत प्रमाणपत्र) दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित जागेची ड्रोनद्वारे मोजणी करण्यासाठी कोणतीही अडचण राहिलेली नसताना भूमी अभिलेख विभागाने तातडीने पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

        ड्रोनद्वारे मोजणी झाल्यास गावठाणातील घरे, रस्ते, शासनाच्या मालकीच्या जागा, नगर परिषदांच्या खुल्या जागा, नाले तसेच इतर सार्वजनिक मालमत्तांची क्षेत्रफळे आणि सीमा निश्चित करता येतील. त्याचबरोबर संपूर्ण परिसराचा अचूक मालमत्ता नकाशा तयार होऊन शासनाच्या मालकीच्या जमिनींचे संरक्षण होण्यास मदत होईल. नागरिकांच्या मालकी हक्कांचे आणि नागरी हक्कांचेही संवर्धन होईल, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

        ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथील जनरल मॅनेजर यांनी ड्रोनद्वारे मोजणीसाठी एनओसी दिलेली असल्याने जमाबंदी आयुक्त तथा संचालक, भूमी अभिलेख कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी तातडीने मोजणीचे आदेश द्यावेत आणि भद्रावती शहरातील गावठाण जमिनींची ड्रोनद्वारे मोजणी करून नागरिकांना आखीव पत्रिका व प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मिनलताई आत्राम यांनी केली आहे.

        दरम्यान, या मागणीवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून तीन महिन्यांच्या आत ड्रोनद्वारे मोजणी पूर्ण करून नागरिकांना आखीव पत्रिका उपलब्ध करून न दिल्यास मुंडण आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मिनलताई आत्राम यांनी निवेदनातून दिला आहे. भद्रावतीतील शेकडो नागरिकांच्या मालमत्ता हक्काशी संबंधित हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने प्रशासनाने नागरिकांची अडचण लक्षात घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

#Bhadravati #BhadravatiNews #Chandrapur #ChandrapurNews #Gavthan #DroneSurvey #DroneMeasurement #PropertyCard #PRCard #AkhivPatrika #SwamitvaYojana #LandSurvey #BhadravatiGavthan #BhumAbhilekh #LandRecords #MinalTaiAtram #Shivsena #ShivsenaMahilaAghadi #ChandrapurNews #MaharashtraNews #Maharashtra #PropertyRights #LandRights #PMAY #GraminVikas #GovernmentSchemes #BhadravatiCity #ChandrapurDistrict #aamchavidarbha

About Author

Advertisement

Next
This is the most recent post.
Previous
थोडे जुने पोस्ट

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top