आमचा विदर्भ - राजुरा (दि. ०९ मार्च २०२६) -
वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या धोपटाळा ओपन कास्ट कोळसा खदान परिसरातील कोलबेंच व कोलस्टॉकला लागलेल्या आगीमुळे निर्माण होणाऱ्या दाट धुरामुळे सास्ती गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात धूर आणि आगजनीची परिस्थिती कायम असतानाही वेकोली प्रशासनाकडून योग्य ती दखल घेतली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी चक्काजाम आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
गेल्या काही दिवसांपासून खदान परिसरातील कोळशाच्या साठ्याला तसेच कोलबेंच भागाला लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर धूर आणि घातक वायू वातावरणात पसरत आहेत. त्यामुळे सास्ती गावासह आसपासच्या परिसरातील नागरिकांना श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ तसेच इतर आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. सतत गावावर धुराचे सावट असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे. या गंभीर परिस्थितीमुळे ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केले. खदान प्रशासनाने तातडीने आग विझवून प्रदूषणावर नियंत्रण मिळवावे तसेच गावकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली.
या आंदोलनात उपसरपंच सचिन कुडे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर झाडे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप नरड, ग्रामपंचायत सदस्य आनंद मांडवकर, सुमन जगलिवार, चंदु नळे, नितेश चेतुलवार, राहुल टेकाम, नरेश ऊपरे, अनिल खवसे, रितिक पेटकर, सोनु मेश्राम, बाप्या कष्टी, पदमाबाई, सविता नरड, पत्तीताई यांच्यासह गावातील अनेक महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ग्रामस्थांच्या मते, खदान परिसरातील आगीमुळे निर्माण होणारे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असून त्याचा थेट परिणाम गावकऱ्यांच्या आरोग्यावर होत आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहून तातडीने आग विझवण्याची आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
#RajuraNews #ChandrapurNews #WCLBallarpur #DhopatalaCoalMine #CoalMineFire #SastiVillage #PollutionIssue #ChakkaJam #LocalProtest #CoalMiningImpact #MaharashtraNews #GroundReport #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.