आमचा विदर्भ - दीपक शर्मा
गोंडपिपरी / चंद्रपूर (दि. २५ सप्टेंबर २०२५) –
भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूर यांच्या विद्यमाने दिनांक 17 सप्टेंबर रोजी बुधवारला स्वामी विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, किरमिरी येथे बिरसा मुंडा जनजातीय गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा आदिवासी सेवक वाघुजी गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक झाडे सर तर प्राथमिक मुख्याध्यापक पिंपळशेंडे सर, शाळेतील सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी गावातून प्रभातफेरी काढून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेत आयोजित सभागृह कार्यक्रमात भगवान बिरसा मुंडा व क्रांतिकारक वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्वागत गीत व आदिवासी नृत्य सादर करण्यात आले.
प्रास्ताविकात माध्यमिक शिक्षक साळवे सर यांनी बालवयातच जीवनाची पायाभरणी महत्त्वाची असल्याचे सांगितले. तर शिक्षक तलांडे सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना मातृभाषा मराठीच्या शिक्षणाचे महत्त्व विषद केले.
प्रमुख वक्ते म्हणून वाघुजी गेडाम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “आजही मी शिक्षण घेत आहे. शिक्षणाने प्रगती साधता येते आणि सुशिक्षित झाल्याशिवाय समाज व राष्ट्राची खरी प्रगती शक्य नाही. प्रत्येक घरातून किमान पदवीपर्यंतचे शिक्षण व्हायला हवे. आपल्या समाजातील महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु या सर्वोच्च पदावर विराजमान आहेत. त्यामुळे आपणही सुशिक्षित होऊन समाजाचे व राष्ट्राचे नेतृत्व करण्यास सक्षम व्हायला हवे.” त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे, आपल्या उद्दिष्टांचा स्पष्ट बोध करून मेहनत घेण्याचे आवाहन केले. तसेच, “मी नेहमीच आपल्या सेवेसाठी तत्पर असेन,” असे आश्वासनही त्यांनी दिले.
यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसह केक कापून साजरा करण्यात आला. कार्यक्रमात चित्रकला व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. शेवटी झाडे सर यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे संचालन भगत सर यांनी केले तर आभार प्रदर्शन निखाडे सर यांनी केले. उत्साही वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.
#BirsaMundaJayanti #TribalPrideDay #ChandrapurNews #KirmiriSchool #WaghujiGedam #VidarbhaUpdates #TribalHeritage #EducationForAll #TribalEmpowerment #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.