आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १८ सप्टेंबर २०२५) -
जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि अनियमितता होत असल्याचा आरोप मनसे कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष सचिन भोयर यांनी केला आहे. सुरक्षा रक्षकांकडून नोकरीच्या बदल्यात २.५० ते ३ लाख रुपयांची उकळी केली जात असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मंडळाची जबाबदारी आणि प्रक्रिया
२०१२ मध्ये महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक नोकरी नियमांनुसार राज्य शासनाने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ स्थापन केले. या मंडळाच्या अध्यक्षपदी सहाय्यक कामगार आयुक्त आणि सचिवपदी सरकारी कामगार अधिकारी असतात. सुरक्षा रक्षकांची नोंदणी, कल्याण आणि देखरेख करणे ही जबाबदारी मंडळावर आहे. उमेदवारांना नियुक्तीवेळी उपस्थिती पत्र, पीएफ, ईएसआयसी, पगार बिल, पोलिस चारित्र्य प्रमाणपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
भोयर यांचे आरोप
मात्र, ही प्रक्रिया बाजूला ठेवून मंडळ अधिकारी उमेदवारांकडून मोठी रक्कम घेऊन बोगस भरती करत असल्याचा आरोप सचिन भोयर यांनी केला. याचे व्हिडिओ आणि ऑडिओ पुरावे त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केले. पात्र उमेदवारांना बाजूला सारून अपात्रांना संधी दिल्याने शेकडो युवक बेरोजगार असल्याचे त्यांनी नमूद केले.
१०१ सुरक्षा रक्षकांचे प्रलंबित प्रकरण
चंद्रपूर सीटीपीएसमध्ये एका खाजगी एजन्सीद्वारे कार्यरत असलेले १०१ सुरक्षा रक्षक आजवर नोंदणीपासून वंचित आहेत. सरकारच्या आदेश असूनही मंडळाने या सुरक्षारक्षकांची नोंदणी न केल्यामुळे त्यांचा रोजगार आणि उपजीविका धोक्यात आली आहे. तसेच, शासकीय रुग्णालयांमध्ये खाजगी एजन्सीतील मूळ सुरक्षा रक्षकांना डावलून बनावट सुरक्षा रक्षकांची बेकायदेशीर नियुक्ती करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
आर्थिक व्यवहारांचा घोटाळा
मेटल उद्योग, तांदूळ गिरण्या, वाहतूक, महावितरण आणि आरोग्य विभागातील काही आस्थापनांसाठी बनावट शिफारस पत्रांच्या आधारे नियुक्त्या झाल्याचे समोर आले आहे. या प्रक्रियेत मंडळाचे अध्यक्ष, सचिव आणि काही कर्मचारी आर्थिक फायद्यासाठी संगनमताने सहभागी असल्याचा आरोप भोयर यांनी केला.
कठोर कारवाईची मागणी
या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच सरकारने तात्काळ चौकशी समिती नेमावी, अशी मागणी सचिन भोयर यांनी केली. पत्रकार परिषदेत माजी नगराध्यक्ष आणि मनसे कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष सचिन भोयर, नितीन भोयर, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष राजेश गायकवाड, सचिव बापूसाहेब जावळे, जिल्हाध्यक्ष समीर पठाण आणि अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#SecurityGuardsScam #ChandrapurScam #FakeRecruitment #JusticeForGuards #UnemployedYouth #LabourRights #WorkersExploitation #EmploymentScam #CorruptionExpose #ManpowerFraud #sachinbhoyar #maharashtranavnirmansena #MNS #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.