चोरीच्या गाड्यांचे स्क्रॅप रूपांतर – चौघे अटकेत
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २९ ऑगस्ट २०२५) -
शहर पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या प्रकरणात तब्बल चार गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्या ताब्यातून ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मोटारसायकल चोरी करून तुकडे-तुकडे करून विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी महेश गौतम काळे वय ३६, रा. भिवापूर वार्ड, चंद्रपूर यांनी २० ऑगस्ट रोजी तक्रार दिली होती की, त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर क्र. एम.एच. ३४-यू-५२१४ मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी लांबवली. सदर वाहनाची किंमत अंदाजे १५ हजार रुपये होती. तक्रार दाखल होताच शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे चौकशी सुरू केली.
तपासादरम्यान पोलिस जाळ्यात आरोपी सुमीत शांताराम अमराजवार (२८), तनवीर कादिर बेग (२५), सत्तार शम्मी खान (३२), जाकीर कासम शेख (३१) याना ताब्यात घेतले. तपासात उघड झाले की आरोपी सुमीत अमराजवार व तनवीर बेग यांनी मोटारसायकलची चोरी केली. त्यानंतर आरोपी सत्तार शम्मी खान याने ग्रॅन्डर कटर मशीनच्या सहाय्याने स्प्लेंडरचे तुकडे केले. इतकेच नव्हे तर चोरीचा माल लपवण्यासाठी काही तुकडे स्वतःकडे ठेवले तर काही जाकीर शेख याच्याकडे दिले. टोळीने चोरीच्या गाड्या तुकडे-तुकडे करून स्क्रॅपमध्ये विकण्याचा रॅकेट उभारल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेला मुद्देमाल –
- हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकलचे तुकडे (किंमत १५,००० रुपये)
- जुनी डिलक्स मोटारसायकलचे तुकडे (किंमत ४०,००० रुपये)
- लोखंड कापण्याचे ग्रॅन्डर कटर मशीन (किंमत २,००० रुपये)
- असा एकूण ५७,००० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत सपोनि. राजेंद्र सोनवणे, दत्तात्रय कोलते, विलास निकोडे तसेच डी.बी. पथकातील पोलीस कर्मचारी सहभागी झाले. सदर प्रकरणाचा पुढील तपास पो.अं. कपुरचंद खरवार करीत आहेत.
#ChandrapurPolice #BikeTheft #CrimeControl #PoliceAction #ChandrapurNews #MotorcycleTheft #CrimeUpdate #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.