Aandolan
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. २६ मार्च २०२५) -
ग्राम महसूल आणि विकास अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ विदर्भ पटवारी संघ, जिल्हा शाखा चंद्रपूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय सामूहिक रजा व धरणे आंदोलन गुरुवारी करण्यात येणार आहे.
प्रमुख मागण्या आणि कारणे :
जिवती तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी किशोर कुलकर यांच्यावरील कायदेशीर मार्गाने लावलेली विभागीय चौकशी रद्द करावी, ग्राम विकास अधिकारी रमेश उमरे यांना डिसेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीतील वेतन मिळाले नाही. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे त्यांच्यावर योग्य उपचार होऊ शकले नाहीत आणि १९ मार्च २०२५ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतरही विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली, ही बाब अन्यायकारक असल्याचे संघाने स्पष्ट केले आहे. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आणि सेवाविषयक लाभ मिळावेत तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी संघाची मागणी आहे.
महसूल विभागातील बहुतांश कामे ऑनलाईन होत असूनही ग्राम विकास अधिकाऱ्यांना अद्याप लॅपटॉप आणि प्रिंटर उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कामकाजात मोठ्या अडचणी येत आहेत. ग्राम विकास अधिकाऱ्यांचे सेवा पुस्तके अद्यावत करून वेतन पडताळणी विभागाकडून प्रमाणित करावी, प्रलंबित वैद्यकीय बिलांचे त्वरित निकाली काढावे आणि भाड्याच्या खाजगी इमारतींमध्ये असलेल्या कार्यालयांचे भाडे अदा करावे. तालुक्यात ग्राम विकास अधिकारी आणि कोतवाल पदे मोठ्या संख्येने रिक्त आहेत. त्यामुळे कामकाजात अडचणी निर्माण होत असून, ही पदे तातडीने भरावीत. महसूल आणि निवडणूक कामांव्यतिरिक्त सुट्टीच्या दिवशी जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडले जाते. तसेच, संगणकीय कामांसाठी अनावश्यक दबाव टाकला जातो आणि कारणे दाखवा नोटीसा देऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्रास दिला जातो.
संघाने या मागण्यांसाठी प्रशासनाचे लक्ष वेधले होते, मात्र प्रशासनाच्या अनास्थेमुळे आंदोलन करण्याची वेळ आली, असे संघाने निवेदनात स्पष्ट केले. जिल्ह्यातील सर्व पटवारी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेण्याचे आवाहन विदर्भ पटवारी संघ, जिल्हा शाखा चंद्रपूर यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.