वन्यजीव मंडळाची मान्यता न मिळाल्याने रखडले होते काम
ग्रीनफिल्ड विमानतळ परिसराच्या औद्योगिक विकासाबरोबरच पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
चंद्रपूर -
चंद्रपुरातील प्रलंबित असलेल्या विमानतळाच्या प्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. वन्यजीव मंडळाची मान्यता न मिळाल्याने हे प्रकरण रखडले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार सातत्याने बैठका घेऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी हालचाली करत आहे. विधानभवनात झालेल्या बैठकीमध्ये मुनगंटीवार यांनी राजुरा ग्रीनफिल्ड विमानतळ या परिसराच्या औद्योगिक विकासाबरोबरच पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून या विमानतळाचे बांधकाम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहे. मुनगंटीवार म्हणाले की, व्याघ्र संवर्धनात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी उपाययोजना ठरवण्याचे काम अधिकाऱ्यांनी करावे. यासोबतच वन पर्यटन, पर्यावरण आणि व्याघ्र संवर्धन आणि आदिवासी वनउत्पादनासाठी बाजारपेठ म्हणून या विमानतळाचा मोठा उपयोग होणार आहे. वन्यजीव मंडळाच्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या नियोजित बैठकीत विमानतळाबाबतच्या सर्व मंजुऱ्या घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या प्रस्तावित विमानतळाच्या धावपट्टीची लांबी आणि त्यासंदर्भातील सरक्षा क्षेत्राच्या
संदर्भात बांधकामाचा प्रश्न आजच्या बैठकीत निकाली काढण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील विहीरगाव व मूर्ती येथे विमानतळ उभारणीसाठी 24 एप्रिल 2016 रोजी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. यासाठी 46 कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे. यामध्ये 41 कोटी रुपयांच्या भूसंपादनासाठी तर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विमानतळासाठी एकूण 840 एकर जागेची आवश्यकता होती. यामध्ये पहिल्या टप्प्यात 720 एकर जमीन संपादित करण्यात आली असून 2500 मीटर धावपट्टीचे काम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यानंतर धावपट्टीची लांबी तीन हजार मीटर प्रस्तावित आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.