- स्वातंत्र्यांच्या 75 वर्षानंतरही चिखलापार चिखलात
- टाकणार निवडणुकीवर बहिष्कार ; मुख्यमंत्र्यांना निवेदन
चंद्रपूर -
चिमूर तालुक्यातील चिखलापार गाव तालुका मुख्यालया पासुन अवघ्या सहा किलो मिटर अंतरावर असुनही आजतागायत दुर्लक्षित राहीले. पावसाळ्यात पुरात गाव पाण्याने वेढले जाऊन गावास बेटाचे स्वरूप प्राप्त होते. रस्त्याअभावी गावकर्यांना गावातच अडकून पडावे लागते. देशाच्या स्वातंत्र्यास 75 वर्ष पुर्ण होऊनही शासन-प्रशासनाच्या उदासीनतेने चिखलापारवासीय रस्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे आता चिखलापारवासीयांनी आगामी निवडणुकांवरच बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
चिखलापार या गावाने पूर पाऊसाने रस्त्याअभावी अनेकदा हालअपेष्टा सहन केल्या. मात्र, याचे आजतागायत सर्वच लोकप्रतिनिधींना तसेच शासनास सोयर सुतक नाही. फक्त निवडणुकांच्या तोंडावर रस्त्याच्या आश्वासणाचे गाजरा शिवाय काहीच मिळाले नाही. दोन वर्षापुर्वी पुर परिस्थितीत सावरगाव येथील तलाव फुटण्याच्या स्थितीत आले होते. ज्यामुळे गाव पाण्यात विसर्जित होण्याचे चिन्ह दिसल्याने बचाव पथकाद्वारे सर्व गाव वासीयांना चिमूर येथे आणण्यात आले. तेव्हा सर्व पक्ष संघटनाचे नेते तथा लोकप्रतिनिधी यांनी येऊन रस्त्याच्या संबधात आश्वासनाचे गाजर दाखविले. मात्र, आज तागायत चिखलापार चिखलातच राहिले.
शासनाची उदासीनता आणि लोकप्रतिनिधींचे पोकळ आश्वासन यामुळे गावकर्यांनी या सर्व व्यवस्थेचा निषेध म्हणून आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्धार केला असून, तसे निवेदन मुख्यमंत्री, महसुलमंत्री, ग्रामविकास मंत्री, मदत व पुनर्वसन तथा जिल्हयाचे पालक मंत्री यांना उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांचे मार्फत दिले. सदर निवेदनात त्वरित मागणी पुर्ण झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. निवेदन देताना गट ग्रामपंचायत कळमगाव सरपंच सुमित्रा गोहणे, उपसरपंच किसन कापसे, पोलिस पाटील निर्मला कापसे, माजी सरपंच चंद्रकांत कापसे, संतोष डांगे, माजी उपसरपंच उद्धालक गेडाम तथा अंगणवाडी सेविका,आशा वर्कर, शेतकरी मित्र आणि गावातील महिला व पुरुष उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.