मूल -
येथे पदवीपर्यंतचे शिक्षण व व्यक्तिमत्वाची जडणघडण झालेल्या सविता अशोक गोविंदवार यांना गोंडवाना विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी प्रदान करण्यात आली. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या मानव्य विद्याशाखा अंतर्गत "मराठीतील बालकथा साहित्याचा चिकित्सक अभ्यास" या विषयावर निवडक बालकथा लेखकांच्या विशेष संदर्भात त्यांनी विद्यापीठाला शोधप्रबंध सादर केला होता. झाडीपट्टी रंगभूमीवरील कलावंत, समिक्षक, लेखक निवृत्त प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. सविता गोविंदवार यांचे शिक्षण मूल येथे झाले. महाविद्यालयीन जीवनात त्यांची विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवड झाली होती. लेखन, वक्तृत्व, संशोधनाची आवड त्यांना विद्यार्थी दशेतच निर्माण झाली होती. त्या सद्या गडचिरोली बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष आहेत. पीएचडी साठी - स्वातंत्र्योत्तर मराठी बालकथा साहित्याचे मूल्यमापन करताना सविता गोविंदवार यांनी सुप्रसिद्ध बालकथा लेखक दिलीप प्रभावळकर, माधुरी पुरंदरे, राजीव तांबे आणि डॉ. अनिल अवचट यांच्या बालकथा साहित्याची चिकित्सा आपल्या संशोधनांतर्गत केली. मराठी साहित्यात बालकथांचे स्थान निश्चित करणे, बालकथा साहित्याचे मानसशास्त्रीय पैलू अभ्यासणे, बालकांच्या व्यक्तित्व विकासात बालकथा साहित्याची भूमिका विशद करणे, आजच्या काळात बालकथांची गरज अभ्यासणे, निवडक बालकथाकारांच्या लेखनाचे वेगळेपण नोंदविणे ही त्यांच्या संशोधन कार्याची उद्दिष्ट्ये होती. साहित्याच्या विविध प्रकारांमध्ये बालकथा साहित्याचे विशेष महत्व असून बालकथा साहित्य बालकाच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावते आणि मुलांना जगाकडे पाहण्याची दृष्टी देते असा निष्कर्ष त्यांनी लावला.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.