Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अनिस ने केली "त्या" गावात जनजागृती
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिवती तालुक्यातील जादूटोण्याच्या संशयावरून अमानुष मारहाण प्रकरण जिवती मारहाण प्रकरणी आणखी 10 लोकांची अटक उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील कुमार...
  • जिवती तालुक्यातील जादूटोण्याच्या संशयावरून अमानुष मारहाण प्रकरण
  • जिवती मारहाण प्रकरणी आणखी 10 लोकांची अटक
  • उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील कुमार नायक यांनी खुळचट अंधश्रद्धेच्या आहारी न जाता विवेकबुद्धीने शांततामय जीवन जगण्याचे केले गावकऱ्यांना आवाहन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
अतिदुर्गम जिवती तालुक्यातील वणी या गावात घडलेल्या जादूटोण्याच्या संशयावरून अमानुष मारहाण प्रकरण घटनेची त्वरित दखल घेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीची टीम आणि पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. अतिशय तणावाच्या वातावरणात आणि कडक पोलीस बंदोबस्तात जनजागृती प्रबोधन सभा घेण्यात आली. सभेत जादूटोणा, करणी, भूत, भानामती आदी विषयांवर चमत्कार भंडाफोड प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. गावात जादूटोणाविरोधी कायद्याची पत्रके वाटली तसेच चित्र प्रदर्शनी लावण्यात आली. देवी अंगात आणून ज्यांनी नावे घेतली त्या चारही स्त्रिया एकापाठोपाठ एक सभा संपल्याबरोबर अंगात देवी आली म्हणून रडू लागल्या, किंचाळू लागल्या, जमिनीवर लोळू लागल्या चौकशीमध्ये त्या स्त्रिया अमावस्या-पौर्णिमेला देवी अंगात आणून गावातील शांतता भंग करतात अशी माहिती मिळाली. त्या महिलांना मानसिक रोग तज्ञाकडे कडे उपचारासाठी नेण्याचे निर्देश देण्यात आले व पोलिसांनी त्यांना उपचारासाठी भरती केले असून उपचार सुरू आहेत. जखमींवर सुद्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची भेट घेऊन त्यांना मानसिक आधार दिला व न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. 
अंधश्रद्ध मानसिकतेतून घडलेल्या सदर घटनेची परिसरात पूनरावृत्ती होऊ नये म्हणून अशा घटना का घडतात, त्यामागची मनोसामाजिक कारणे आणि उपायांसह अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक अनिल दहागांवकर, जिल्हा सचिव धनंजय तावाडे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला आणि जादूटोणा भूत, भानामती, करणी या अस्तित्वहीन बाबी असून अशा अंधश्रध्दांच्या व मांत्रिकांच्या प्रभावात न येता गावातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन केले.
उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील कुमार नायक यांनीही खुळचट अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन कायदा हातात न घेता विवेकबुद्धीने शांततामय जीवन जगण्याचे गावकऱ्यांना आवाहन केले. याप्रसंगी पोलिस निरीक्षक संतोष अंबिके, पंचायत समिती उपसभापती महेश देवकते, माजी उपसभापती व सामाजिक कार्यकर्ते सुग्रिव गोतावळे यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. चोख पोलिस बंदोबस्त व तणावपूर्ण वातावरणात पार पडलेल्या सदर प्रबोधन कार्यक्रमात गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अतिशय संवेदनशील व महत्त्वपूर्ण अशा या कार्यक्रमाच्या आयोजन व यशस्वीतेसाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
जिवती मारहाण प्रकरणी आणखी 10 लोकांची अटक झाली आहे. अटक झालेल्या लोकांत शशीकांत उर्फ किरण चंद्रमणी कराळे वय 25, साहेबराव सटवाजी पौळ वय 35, मनोहर परशुराम भिसे वय 45, केशव श्रीहरी कांबळे वय 30, दिनेश अंकुश सोनकांबळे वय 23, दत्ता धोंडीराम तेलंगे वय 35, भागवत गोपाळ शिंदे वय 34, विठ्ठल किसन पांचाळ वय 37, वैजनाथ संबाजी शिंदे वय 55, विठ्ठल जगन्नाथ शिंदे वय 35 यांचा समावेश आहे. या सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता सर्वांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून आरोपींना अटक केली आहे. तेलंगाना सीमेवर असलेल्या वणी गावाला सध्या पोलीस बंदोबस्त असून परिस्थिती शांत व नियंत्रणात आहे.







About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top