- वायू व ध्वनी प्रदूषण बंद न केल्यास कायदेशीर कारवाई
- नगरपरिषदेकडून माणिकगड सिमेंट कंपनीला खुले पत्र
- मागच्या वर्षी नगर परिषद ने ठोठावला ३३५००/- दंड
- यंदा होणार का कायदेशीर कारवाई व दंडात वाढ
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
गडचांदूर शहराच्या हद्दीत असलेल्या माणिकगड सिमेंट कंपनीतून निघणारी धूर व जळालेली भुकटी हवेत मिसळून वायुप्रदूषण तसेच मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत असून त्यामुळे नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या मागणीनुसार आता नगरपरिषदेने थेट सिमेंट कंपनी विरोधात पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून माणिकगड सिमेंट कंपनीला खुले पत्र लिहून दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याबाबत इशारा दिला आहे.
प्रदूषण थांबविण्याकरिता योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत नगरपरिषदेकडून माणिकगड सिमेंट कंपनीला वेगवेगळ्या पत्रानुसार अवगत करण्यात आले होते. त्यानुसार काही दिवसांपूर्वी झालेल्या आढावा बैठकीत कंपनी व्यवस्थापनाचे अधिकारी व नगरपरिषदेचे पदाधिकारी व अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेनुसार होणारे वायू व जल ध्वनी प्रदूषण कमी करण्याबाबत वेळोवेळी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, कंपनीकडून प्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना पाठविण्यात येणाऱ्या अहवालाची प्रत नगरपरिषद कार्यालयास सादर करावी. तसेच कंपनी व्यवस्थापनामार्फत वृक्ष लागवडीबाबत कृती आराखडा नगरपरिषदेत तात्काळ सादर करण्यात यावा असे निश्चित करण्यात आले होते. मात्र यावर अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची कंपनीकडून पावले उचलण्यात आलेली नाही. नगरपरिषद क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असून यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप होत आहे. आपण याबाबतीत आजपावेतो कुठलीही ठोस उपाययोजना न केल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे व त्या अनुषंगाने कार्यालयास अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहे.
यापूर्वी प्रदूषणासाठी ३३ हजार ५०० इतक्या रकमेची दंडात्मक कारवाई करून योग्य त्या उपाययोजना राबविण्याबाबत निर्देशित करण्यात आले होते. मात्र त्यावरही उपायोजना न झाल्याचे मुख्याधिकारी यांनी पत्रात लिहिले आहे.
महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम २७८ व २८० अन्वये तरतुदीनुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची गंभीरतेने नोंद घ्यावी. अशा प्रकारची नोटीस मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांच्या सहीनिशी कंपनीला देण्यात आलेली आहे. पुढे कंपनी कशाप्रकारे ठोस उपाययोजना करतात याकडे गडचांदुरवासीयांचे लक्ष लागले आहे.
प्रदूषण हा आजचा विषय नसून अनेक वर्षापासून माणिकगड सिमेंट कंपनीकडून मोठ्याप्रमाणात शहरात धूळ सोडण्यात येत आहे. याबाबत आतापावेतो अनेक नागरिकांनी तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत. मात्र कंपनी प्रशासन वेगवेगळ्या पक्षातील स्थानिक पुढाऱ्यांना सोबत घेऊन कंपनीच्या सुरात सूर मिळवत असते. नागरिकांच्या तक्रारीनंतरही वायू व ध्वनी प्रदूषण वाढतच आहे. गडचांदूर येथील नागरिकांनी पक्षभेद विसरून संघटित होऊन प्रदूषणाविरोधात लढण्याची गरज निर्माण झाली आहे.- विक्रम येरणे, नगरसेवक तथा गटनेता काँग्रेस
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.