आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
हैदराबाद -
ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका लक्षात घेत केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले असतानाच तेलंगणामधून आलेल्या बातमीने खळबळ उडाली आहे. तेलंगणामध्ये एकाच शाळेतील ४५ विद्यार्थी आणि एक शिक्षक अशा ४६ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे.
तेलंगणामधील संगारेड्डी जिल्ह्यात मुथंगी या गावातून कोरोनाबाबत चिंता वाढवणारा प्रकार समोर आला आहे. या गावात महात्मा ज्योतिबा फुले गुरुकुल या शाळेतील ४५ विद्यार्थ्यांचा तसेच एका शिक्षकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणा सतर्क झाल्या असून आवश्यक पावले टाकण्यात येत आहेत. या सर्वांचे नमुने जीनोम सीक्वेन्सिंगसाठी हैदराबाद येथे पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतरच अधिक बाबी स्पष्ट होणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. गायत्री यांनी याबाबत माहिती दिली. कोरोनाची लागण झालेल्या सर्वांना सध्या विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, तेलंगाणा सरकारने आधीच राज्यात अलर्ट जारी केलेला आहे. ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेत बाहेरून येणाऱ्या प्रवाशांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. त्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत. दक्षिण आफ्रिका, बोत्स्वाना, हाँगकाँग तसेच काही युरोपीय देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळेच या देशांतून येणाऱ्या प्रवाशांबाबत दक्षता बाळगण्यात येत आहे. लसीकरण झाले असले तरी संबंधित प्रवाशाने होमक्वारंटाइन राहावे, असे निर्देश देण्यात आलेले आहेत. ज्यांचे लसीकरण झालेले नाही किंवा एकच डोस घेतलेला आहे, अशा प्रवाशांची तपासणी करण्यात येईल व करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यास नमुने घेऊन ते जीनोम सीक्वेन्सिंगला पाठवण्यात येतील, अशी माहिती राज्याचे आरोग्य संचालक जी. श्रीनिवास यांनी सांगितले. तामिळनाडू सरकारनेही ओमिक्रॉनला रोखण्यासाठी पावले टाकली असून जिल्हा पातळीवर दक्षता बाळगण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.