- गुन्हा दाखल न झाल्यास न्यालायात जाण्याची तक्रारदाराची तयारी
- सामाजिक कार्यकर्ते व कामगार नेते विजय ठाकरे यांनी केली तक्रार
- बघा व्हिडीओ : काय म्हणाले विजय ठाकरे
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
कोरपना तालुक्यातील तामशी रीठ (इरई) पैनगंगा रेतीघाटातून लाखो रुपयांची रेती चोरी संदर्भात चक्क कोरपनाचे तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांच्या विरुद्धच दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा अशी लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ता व कामगार नेते विजय ठाकरे यांनी पोलीस स्टेशन गडचांदुर येथे केली आहे.
या तक्रारीद्वारे पैनगंगा नदी पात्रातून अवैध रेती उत्खनन, साठवणूक व विक्री प्रकरणी शासनाचा कोट्यावधी रूपयाचा महसूल बुडविण्याचा आरोप तहसीलदार वाकलेकर आणि मंडल अधिकारी चव्हाण यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी महसूल आयुक्त नागपुर यांनी तहसीलदार वाकलेकर यांची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे.
सामाजिक कार्यकर्ते विजय ठाकरे यांनी तक्रारात नमूद केले आहे की, मौजा तामशी रीठ (इरई) पैनगंगा रेतीघाट गट क्रमांक १६-१९-२२-२३ व २६ आराजी हेक्टर उपलब्ध रेती साठा अंदाजे १७६६ ब्रास याप्रमाणे ह्या रेतीघाटाचा लिलाव झाला होता परंतु प्रत्यक्षात येथे मंजूर लीजच्या प्रमाणापेक्षा अधिक रेतीचा उपसा करण्यात आला. वेळोवेळी निवेदन व प्रसारमाध्यमांच्या माध्यमाने यावर प्रकाश टाकण्यात आला मात्र या रेटीघाटाच्या संदर्भात कसलीही कारवाही न झाल्याची माहिती विजय ठाकरे यांनी दिली आहे. सदर रेतीघाटा वरून झालेल्या रेती तस्करीला तहसीलदार जबाबदार आहेत त्यांच्यामुळे शासनाचा महसूल व पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे. रेतीघाटावरून अपेक्षेपेक्षा जास्त उपसा झाल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून जलचर प्राण्यांच्या जीवनावरही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी प्रशासनाने तातडीने सखोल चौकशी करावी. दोषींविरुद्ध भारतीय दंडसंहितेचे कलम-नियम-उपनियम व अटी नुसार गुन्हा दाखल करून कार्यवाही व्हावी अशी लेखी तक्रार गडचांदूर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास न्यालायात दाद मागण्याची तयारी आम्ही ठेवली आहे असे विजय ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या व्हिडीओत म्हटले आहे. आमचा प्रतिनिधीने याविषयी तहसीलदार कोरपना यांचे मत जाणून घेण्याकरिता फोनवर संपर्क साधला असता त्यांनी फोन नाही उचलला.
विजय ठाकरे यांच्या या आरोप व तक्रारीमुळे कोरपना तालुक्यात एकच खळबळ उडाली असून या तक्रारीविषयी पोलीस व प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.