- मंत्रिमंडळ बैठकीत एकमत ; आरोग्यमंत्र्यांचे सूतोवाच
- मंत्रिमंडळाच्या बैठकीत 18 ते 44 वर्षे वयोगटातील लसीकरण थांबविण्याचा निर्णय
- महत्वाची माहिती - जाणून घ्या संपूर्ण माहिती
मैथिली माहेश्वरी - आमचा विदर्भ प्रतिनिधी मुंबई -
लॉकडाऊन लावण्यात आल्यानंतर राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चांगलीच घट होत आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत आणखी घट होण्यासाठी राज्यात १५ मेपर्यंत लागू केलेले निर्बंध ३१ मेपर्यंत वाढवावेत, असे मत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे राज्यात ३१ मेपर्यंत लाॅकडाऊन वाढवला जाईल, असे सूतोवाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी केले. दरम्यान, गेल्या दीड महिन्यापासून व्यापारउदीम थंडावल्याने राज्याचे सुमारे ४० ते ५० हजार कोटींचे नुकसान झाले अाहे. दरम्यान, लाॅकडाऊन वाढीस व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला असून अंतिम निर्णय घेण्यापूर्वी उद्योजक, व्यापारी, व्यावसायिकांशी चर्चा करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर टोपे प्रसार माध्यमांशी बोलत होते. राज्यात लॉकडाऊन लावण्याआधी रुग्णांची संख्या ७ लाखांपर्यंत पोहोचली होती. मात्र आता ती ४ लाख ७५ हजारांपर्यंत खाली आली आहे. देशाचा रुग्णवाढीचा दर १.४ आहे, तर राज्याचा ०.८ पर्यंत घसरला आहे. देशातील ३६ राज्यांच्या तुलनेत रुग्णवाढीत राज्य आज ३० व्या क्रमांकावर आहे. या रुग्णघटीमध्ये निश्चितच निर्बंधाचे सकारात्मक परिणाम दिसून आले असल्याने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहुतांश मंत्र्यांनी निर्बंध पुढे वाढवावेत असेच मत व्यक्त केले आहे. त्यामुळे निर्बंध ३१ मेपर्यंत वाढवले जातील. मात्र याबाबतची अंतिम घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच करतील, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.
१५ मेनंतरच्या निर्बंधांबाबतची मार्गदर्शक सूचना येत्या दोन-तीन दिवसांत जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. सध्याच्या निर्बंधात विशेष बदल केला जाईल असे वाटत नाही. सध्या आहे त्या नियमांच्या आधारे राज्यव्यापी लाॅकडाऊन ३१ मेपर्यंत लागू होऊ शकतो. मात्र ज्या जिल्ह्यात रुग्णवाढ मोठी आहे तेथे स्थानिक प्रशासनाने कडक लॉकडाऊन लागू केला आहे. त्यावर याचा परिणाम होणार नाही, असे टोपे यांनी स्पष्ट केले. ५ एप्रिलपासून राज्यात लाॅकडाऊन हळूहळू वाढवण्यास सुरुवात केली. त्यास राज्यातील व्यापाऱ्यांच्या संघटनांनी मोठा विरोध केला होता. अनेक जिल्ह्यांत राज्य सरकारच्या विरोधात आंदोलने उभी राहिली होती. आता पुन्हा १५ दिवसांचा लाॅकडाऊन वाढवण्यात येणार असल्याने व्यापाऱ्यांचा विरोध वाढणार आहे.
आयसीएमआरचे प्रमुख भार्गव यांचे आवाहन
देशातील ज्या जिल्ह्यांत संसर्गाचा दर १०%हून अधिक आहे तेथे ६ ते ८ आठवड्यांचे कडक लॉकडाऊन लागू केले पाहिजे, असे अावाहन भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी केले. कडक लॉकडाऊन केला तरच या जीवघेण्या महामारीवर नियंत्रण शक्य होईल, असेही ते म्हणाले.
केंद्र सरकारमधील एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने कडक आणि दीर्घ लॉकडाऊनच्या समर्थनार्थ केलेले हे पहिले वक्तव्य आहे. भार्गव यांनी याबाबत दाखला देताना दिल्लीचे उदाहरण दिले आहे. त्यानुसार, दिल्लीत एक वेळ संसर्गाचा दर ३५% होता. तो आता १७% झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्याचे केंद्र सरकार टाळत आहे. केंद्राने हा निर्णय राज्यांवर सोपवला आहे. सद्य:स्थितीत देशातील ७१८ जिल्ह्यांपैकी तीन चतुर्थांश जिल्ह्यांत कोरोना चाचणी केलेल्या लोकांमधील संसर्गाचा दर १० टक्क्यांहून अधिक आहे. यात दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूसारख्या महानगरांचा समावेश आहे.
सरकारी काम अन् ८ दिवस थांब
सरकारी काम अन् ८ दिवस थांब असे तरुणांना सांगण्याची वेळ आली आहे. लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसताना केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हट्टामुळे १ मेपासून मोठ्या जोमात प्रारंभ केलेल्या १८ ते ४४ वयोगटाच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणास ब्रेक लागला आहे. लस तुटवड्यामुळे तूर्त या गटाचे लसीकरण थांबवण्यात येत असून २० मेनंतर सीरम इन्स्टिट्यूटने राज्याला दरमहा १ कोटी डोस देण्याचे आश्वासन दिले आहे. ती लस मिळताच पुन्हा १८ ते ४४ वयोगटाच्या नागरिकांचे लसीकरण सुरू होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली. १ मेपासून केंद्र सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास तरुणांचे लसीकरण २० मेपर्यंत...राज्यांना परवानगी दिली होती. या गटाच्या ५ लाख नागरिकांना पहिला डोस दिला आहे. या गटासाठी लस पुरवठ्याची जबाबदारी केंद्राची आहे. मात्र लसीचा मोठा तुटवडा असल्याने दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेतील नागरिकांची ४५ ते ६० दिवसांची मुदत संपत आहे. म्हणून १८ ते ४४ वयोगटासाठी राज्याने खरेदी केलेली लस ४५ वयाेगटाला वापरण्याचा निर्णय राज्याने घेतला असल्याचे टोपे यांनी सांगितले.
रुग्णसंख्येत चढ -उतार
गेले महिनाभर किमान दिवसाला ६० हजार रुग्णांची भर पडत असताना आता रुग्णंसख्येत घसरणीचा ट्रेंड दिसतोय. मात्र गेल्या तीन दिवसांत पुन्हा थोडी वाढ नोंदवली गेली. बुधवारी ४६,७८१ नव्या बाधितांची नोंद झाली. त्यापूर्वी मंगळवारी ४०,९५६, तर सोमवारी ३७,३२६ रुग्णांची नोंद झाली होती. बुधवारी राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या ५ लाख ४६ हजार १२९ होती, तर ५८,८०५ रुग्ण बरे झाले.
छोटे उद्योजक-व्यापाऱ्यांचा विरोध, मदत देण्याची मागणी
जम्मू-काश्मीर, आसाममध्येही कडक निर्बंध : ईदच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये वाढलेली गर्दी पाहता बुधवारी श्रीनगरसह इतर काही जिल्ह्यांत लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले. अनेक भागांत १७ मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. महत्त्वाचे मार्ग सील करण्यात आले असून शहर व जिल्ह्यांना जोडणारे मार्गही बंद करण्यात आले आहेत. सार्वजनिक वाहतूक बंद असून बाजारपेठाही बंद करण्यात आल्या आहेत.
केवळ १० लाख डोस उपलब्ध
राज्यात १६ लाख कोविशील्ड, तर ४ लाख असे २० लाख नागरिक कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. राज्याकडे सध्या ७ लाख कोविशील्ड, तर ३ लाख कोव्हॅक्सिन असे एकूण १० लाख डोस आहेत.
उद्योजक-व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्या
मागील वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये भरमसाट आलेली वीज बिले यात दिलासा देऊ, असे शासनाने म्हटले होते. मात्र सरतेशेवटी जबाबदारी झटकून मोकळे झाले. आता या लॉकडाऊनमध्येही व्यवसाय बंद असल्याने नेमकी कुठली मदत राज्य शासन करणार हे स्पष्ट करून उद्योजक-व्यापारी संघटनांसोबत चर्चा करूनच पुढील निर्णय घेणे अपेक्षित आहे, असे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सांगितले.
- आणखी १५ दिवसांचा लाॅकडाऊन लादल्यास मुंबई महानगर परिसर क्षेत्रातील किरकोळ दुकानदारांना तब्बल ५० हजार कोटींचा फटका बसेल, असे ठाण्यातील व्यापारी संघटनेचे विरेन शहा यांनी सांगितले.
- १४ मे रोजी अक्षय्य तृतीयेचा सोने खरेदीचा मुहूर्त हुकणार आहे. या एक दिवशी २०० कोटींची उलाढाल ठप्प होणार असल्याचे मुंबई ज्वेलर्स संघटनेचे कुमार जैन यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.