शिवारात बिबट्याच्या हालचाली वाढल्याची चर्चा; सतर्क राहण्याचा सल्ला
आमचा विदर्भ - वृत्तसेवा
राजुरा (दि. १८ जुलै २०२६) -
राजुरा तालुक्यातील विहीरगाव शिवारात बिबट्याने घरासमोर बांधलेल्या जनावरांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात मधुकर कोडापे यांची एक बकरी ठार झाली असून ईश्वर तेलंग यांच्या गायीच्या वासराला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे विहीरगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ जुलैच्या रात्री विहीरगाव येथील मधुकर कोडापे यांच्या घरासमोर बांधलेल्या बकरीवर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात बकरीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर बिबट्याने ईश्वर तेलंग यांच्या गायीच्या वासरावरही झडप घालत त्याला जखमी केले. बिबट्याचा हल्ला सुरू असल्याचे लक्षात येताच गावातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. ग्रामस्थांनी दफडे वाजवून आणि मोठा आवाज करून बिबट्याला जंगलाच्या दिशेने पळवून लावले. त्यामुळे आणखी मोठी जीवितहानी टळल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी पंचनामा करून परिस्थितीची पाहणी केली तसेच ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले. घराबाहेर जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, रात्री एकट्याने शेत किंवा जंगलालगतच्या परिसरात जाणे टाळावे आणि बिबट्याचा वावर आढळल्यास त्वरित वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
विहीरगाव परिसरात बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने या परिसरात गस्त वाढवून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे तसेच जनावरांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
#Rajura #Vihirgaon #LeopardAttack #Chandrapur #ChandrapurNews #RajuraNews #WildlifeNews #Leopard #ForestDepartment #VidarbhaNews #MaharashtraNews #BreakingNews #AnimalAttack #WildlifeAlert #VillageNews #FarmersNews #ForestAlert #LatestNews #LocalNews #AamchaVidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.