आमचा विदर्भ – दीपक शर्मा
राजुरा (दि. २६ नोव्हेंबर २०२५) –
राजुरा तालुक्यातील सास्ती परिसरात अवैध रेती तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला. पोलीस स्टेशन राजुरा येथील पोहवा विक्की राजकुमार निर्वाण, पोहवा रामेश्वर चाहारे, पोअ शफीक शेख तसेच दोन पंच यांच्या पथकाने २५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री पेट्रोलिंगदरम्यान ही कारवाई केली. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार सास्ती नाल्यातून रेती चोरी करून राजुरा दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरवर लक्ष ठेवण्यात आले. त्यानुसार रात्री अंदाजे दोन वाजता सास्ती–रामनगर मार्गावर लाल रंगाचा संशयित ट्रॅक्टर दिसताच पथकाने सापळा रचून वाहन अडविले.
तपासणीदरम्यान महिंद्रा कंपनीचा एमएच ३४ एल ५०८३ नंबरचा लाल रंगाचा ट्रॅक्टर आणि बिननंबर ट्रॉलीमध्ये एक ब्रास रेती किंमत सुमारे ५ हजार रुपये भरलेली आढळली. चालकाने आपले नाव दिवाकर शंकर कोयाडवार (वय ५४, रा. सास्ती) असल्याचे सांगितले. त्याच्याकडे रेती वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा वाहनाची आवश्यक कागदपत्रे नव्हती. पुढील चौकशीत ट्रॅक्टरचा मालक दिवाकर कोयाडवारच असल्याचे, तर ट्रॉलीचा मालक महेंद्र गजानन उपरे (वय ५०, रा. सास्ती) असल्याचे स्पष्ट झाले. दोघांनी मिळून सास्ती नाल्यातून अवैधरीत्या रेती उपसा करून विक्रीसाठी नेत असल्याची कबुली पंचासमक्ष दिली. कारवाईत एकूण ९ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात महिंद्रा ट्रॅक्टर किंमत अंदाजे ९ लाख, बिननंबर ट्रॉली किंमत अंदाजे ९० हजार आणि एक ब्रास रेती ५ हजार यांचा समावेश आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींवर कलम ३०३(२) भान्यासह कलम ४८(७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ तसेच कलम १३०(१)/१७७ मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईची फिर्याद पोहवा विक्की राजकुमार निर्वाण यांनी नोंदविली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
#IllegalSandMining #RajuraPoliceAction #SastiVillageNews #SandMafia #PoliceSeizure #ChandrapurUpdates #CrimeReport #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.