नागरिकांचा आरोप – अपूर्ण रस्ता अपघातांना कारणीभूत
माजी आमदार सुभाष धोटे यांचे मृतक कुटुंबीयांना सांत्वन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०१ सप्टेंबर २०२५) -
वरुड-राजुरा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात आदिवासी तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवार, दिनांक 30 ऑगस्ट रोजी रात्री जवळपास साडेनऊ वाजताच्या सुमारास निर्भय पेट्रोल पंपाजवळ घडली. या धडकेत पेठ वॉर्ड येथील कंडक्टर म्हणून काम करणारा आदिवासी तरुण अजय शंकर आत्राम (वय 25) याचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमींमध्ये त्याचे वडील शंकर आत्राम आणि ट्रक चालक राजेंद्र सरवर यांचा समावेश असून त्यांना उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ट्रक क्रमांक MH-34-BZ-9598 वरुरहून राजुराकडे येत होता. त्याच वेळी MH-34-BG-4381 राजुरा ते आसिफाबादकडे जाणाऱ्या ट्रक चालकाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बाजूला बसलेला अजय आत्राम गाडीबाहेर फेकला जाऊन समोरच्या ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
![]() |
कुटुंबियांना धीर देतांना जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व लोकप्रिय माजी आमदार सुभाषभाऊ धोटे |
या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल जीवतोडे यांनी पोलिसांना त्वरित माहिती देऊन मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. नागरिकांचे म्हणणे आहे की, जीआर कंपनी ने दोन महिन्यांपूर्वी केलेले रस्त्याचे काम अपूर्ण असून वाहतूक एकाच मार्गावरून सुरू आहे. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. दरम्यान, अपघातातील मृतक अजय आत्राम हा उपजीविकेसाठी कंडक्टर म्हणून काम करत होता. अपघातात मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घरातील एकुलता एक आधारस्तंभ हरपल्याने आई, पत्नी व दीड वर्षांच्या चिमुकलीवर संकट कोसळले आहे.
या प्रसंगी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन मृतकाच्या आई, पत्नी व मुलीला धीर दिला. ते स्वतः अश्रू अनावर होऊन भावुक झाले. धोटे यांनी दोषी ट्रान्सपोर्टर मालकाकडून तातडीने आर्थिक मदतीची मागणी केली आहे. तसेच या दुःखद प्रसंगी आदिवासी नेते महिपाल मडावी, रवी आत्राम, माजी नगरसेवक गजानन भटारकर, जिल्हा महासचिव एजाज अहमद यांसह काँग्रेस पदाधिकारी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून कुटुंबीयांना आधार दिला. अजय आत्रामच्या अकाली निधनाने राजुरा तालुक्यातील आदिवासी समाजात शोककळा पसरली आहे. नागरिकांनी या अपघातानंतर अपूर्ण रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून, चेतावणी फलक लावून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
#RajuraAccident #AjayAtram #TribalYouth #RoadSafety #ChandrapurNews #TruckCollision #JusticeForVictims #DemandSafeRoads #subhashdhote #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.