समोरून येणाऱ्या वाहनांच्या लख्ख प्रकाशामुळे गेला तोल
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा / बल्लारपूर (दि. ०१ सप्टेंबर २०२५) -
गणेशोत्सवासाठी पांढरपोवनी कडे जात असताना दुचाकीवरील तोल गेल्याने युवक वर्धा नदीत पडून वाहून गेला. ही हृदयद्रावक घटना शनिवार, दिनांक 30 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास वर्धा नदीच्या पुलावर घडली. मृतकाचे नाव अजय हरिश्चंद्र गिरटकर (रा. कोठारी) असे असून, पोलिसांचा शोधमोहीम सुरू असली तरी त्याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कोठारी येथील धान्य व्यापारी हरिश्चंद्र गिरटकर यांची मुलगी पांढरपोवनी येथे वास्तव्यास आहे. तिच्या घरी गणेशोत्सवाचे आयोजन असल्यामुळे तिचा भाऊ अजय गिरटकर हा दुचाकी क्र. MH-34-CC-3598 ने पांढरपोवनीकडे निघाला होता. रात्री आठच्या सुमारास वर्धा नदीच्या पुलावर पोहोचताच समोरून येणाऱ्या वाहनांच्या लख्ख प्रकाशामुळे त्याचे डोळे दिपून गेले व दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे तो पुलावरून खाली पडून नदीच्या प्रवाहात वाहून गेला. दुचाकी मात्र पुलावरच पडून राहिली.
दरम्यान, पांढरपोवनीमध्ये बहिणीकडे गणेशोत्सव सुरू असल्याने अजयचे आई-वडील, भाऊ व वहिनी आधीच तेथे पोहोचले होते. कुटुंबीय रात्री उशिरापर्यंत त्याची वाट पाहत होते. भ्रमणध्वनीवर संपर्क न आल्याने घरच्यांची चिंता वाढली. सोशल मीडियावर पुलावर दुचाकी आढळल्याची माहिती समजताच गाडीचा नंबर पाहून ती अजयचीच असल्याची खात्री पटली.
या घटनेची माहिती दुसऱ्या दिवशी सकाळी बल्लारपूर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बोटींच्या सहाय्याने शोधमोहीम सुरू केली. मात्र नदी दुधडी भरून वाहत असल्याने शोधकार्यात अडथळा येत आहे. परिसरातील पोलीस ठाणे व पोलीस पाटलांना माहिती देऊन शोध सुरू ठेवण्यात आला आहे. बहिणीच्या घरी विघ्नहर्ता गणपती बाप्पा विराजमान झालेल्या आनंदोत्सवात सहभागी होण्यापूर्वीच अजयचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कोठारी परिसरात शोककळा पसरली आहे.
#WardhaRiverAccident #AjayGiratkar #RoadAccident #ChandrapurNews #GaneshFestivalTragedy #WardhaBridge #SearchOperation #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.