कोळसा वाहतुकीसाठी सास्ती - बाबुपेठ बी.जी. रेल्वे लाईन उभारणी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २ ऑगस्ट २०२५) -
वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रातील कोळसा वाहतुकीसाठी प्रस्तावित बाबुपेठ-सास्ती ब्रॉड गेज रेल्वे लाईनसाठी राजुरा तालुक्यातील कढोली, मानोली व गोवरी या गावांतील शेतजमिनी अधिग्रहीत केल्या जाणार आहेत. या अधिग्रहणामुळे शेतकऱ्यांना विविध समस्या, अडचणी व भविष्यकालीन नुकसान सहन करावे लागू शकते. या पार्श्वभूमीवर प्रभावित शेतकऱ्यांनी आपले प्रश्न व मागण्या मांडण्यासाठी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांची भेट घेतली.
दि. २ ऑगस्ट २०२५ रोजी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य राकेश हिंगाणे, रामपूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेश कुडे आणि विठोबाजी हिंगाणे यांच्या उपस्थितीत, इतर मागास व अन्य प्रवर्गातील शेतकऱ्यांनी अहीर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांनी प्रस्तावित अधिग्रहण सी.बी. अॅक्ट 1957 अंतर्गत व्हावे, अधिग्रहित जमिनीस वाजवी मोबदला मिळावा, स्थानिकांना नोकरी व रोजगाराची हमी मिळावी यासाठी निवेदन सादर केले.
शेतकऱ्यांच्या मागण्या योग्य व न्याय्य असल्याचे मान्य करत अहीर यांनी, यापूर्वी गोयेगाव रेल्वे सायडिंगच्या प्रकल्पातही वेकोलीने स्वतः जमीन अधिग्रहीत करून ती रेल्वे विभागाला सुपूर्द केल्याचा दाखला दिला. त्याच पद्धतीने या प्रकल्पासाठी देखील वेकोलीनेच थेट अधिग्रहण करावे, असे अहीर यांनी सुचवले.
या रेल्वे लाईनमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचे दोन भाग होणार असून त्यामुळे जमिनीचे महत्त्व, उपयुक्तता व बाजारमूल्य घटणार आहे. परिणामी, अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळणे गरजेचे आहे. रोजगार, मोबदला, पुनर्वसन आणि पायाभूत सुविधांसह न्याय मिळवून देण्यासाठी आपण विशेष लक्ष देऊन प्रयत्न करू, असे आश्वासन अहीर यांनी शेतकऱ्यांना दिले.
#LandAcquisition #FarmerRights #ChandrapurNews #RailwayProject #WCLUpdates #BabulpetSastiRailway #HansrajAhir #RajuraFarmers #RuralVoices #CompensationDemand #AgricultureMatters #aamchavidarbha #vidarbha #chandrapurupdate #chandrapurian #chandrapur
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.