Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: बनावट विवाह प्रमाणपत्राच्या आधारे कोट्यवधींचा घोटाळा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बनावट विवाह प्रमाणपत्राच्या आधारे कोट्यवधींचा घोटाळा मृत महिला कर्मचाऱ्याच्या नावावर १.३५ कोटी लाटण्याचा प्रकार आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट...
बनावट विवाह प्रमाणपत्राच्या आधारे कोट्यवधींचा घोटाळा
मृत महिला कर्मचाऱ्याच्या नावावर १.३५ कोटी लाटण्याचा प्रकार
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर (दि. १६ मे २०२५) -
       महाराष्ट्र राज्य विज कंपनीतील मृत महिला कर्मचाऱ्याला आपली पत्नी म्हणून दाखवत, बनावट विवाह प्रमाणपत्राच्या आधारे १.३५ कोटी रुपयांची रक्कम हडपण्याचा प्रकार चंद्रपुरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये बामनी बल्लारपूरच्या ग्राम विकास अधिकारी लक्ष्मण शेंडे, बल्लारपूरच्या गट विकास अधिकारी धनंजय साळवे, ग्राम पंचायत लिपिक रेखा देरकर, मृत महिलेचा पती असल्याचा दावा करणारा बादल खुशालराव उराडे आणि नकली विवाह प्रमाणपत्राच्या आधारावर कायदेशीर उत्तराधिकारी प्रमाणपत्र देण्यात मदत करणारा एक वकील यांचा समावेश आहे.

१९९४ मध्ये पतीचे निधन, २०२१ मध्ये महिलेचा मृत्यू
        माहितीनुसार, मालाबाई पारखी नावाची महिला एमएसईबीमध्ये आपल्या पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर कार्यरत होती. तिच्या पतीचे १९९४ साली निधन झाले होते. त्यानंतर मालाबाईला वर्धा कार्यालयात नोकरी मिळाली, आणि पुढे तिची बदली बल्लारपूर येथे झाली. बल्लारपूरमध्ये ती बादल उराडे यांच्या भाड्याच्या घरात राहत होती. २०२१ साली कोरोनामुळे मालाबाईचे निधन झाले. कोरोना काळात कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्याने सरकारकडून ५० लाख, ग्रॅच्युइटी, पीएफ मिळून १.३५ कोटींची रक्कम मिळणार होती. ही रक्कम मिळवण्यासाठी बादल उराडे यांनी मालाबाईला आपली पत्नी म्हणून दाखवत बनावट विवाह प्रमाणपत्र सादर केले.

बनावट विवाह प्रमाणपत्राच्या आधारे उत्तराधिकारी प्रमाणपत्र
        बादल उराडे यांनी बामनी ग्राम पंचायतकडून विवाह प्रमाणपत्र प्राप्त करून एका वकिलाच्या मदतीने वारिसान प्रमाणपत्र मिळवले. मात्र, या प्रकरणाची माहिती मिळताच मृत महिलेचा भाऊ बाबा उरकुडा पारखी यांनी समाजसेवी विनोद खोब्रागडे यांच्या सहाय्याने या बनावट कागदपत्रांविरुद्ध तक्रार नोंदवली. चौकशीत विवाह प्रमाणपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. या आधारावर बल्लारपूर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top