अल्ट्राटेक सिमेंट कंपनी विरोधात आंदोलनाला सुरुवात
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत
गडचांदूर (दि. १६ मार्च २०२५) -
अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या हेकेखोर धोरणाच्या विरोधात कोरपना तहसील भारतीय जनता पार्टी व अल्ट्राटेक कंपनीच्या दत्तक गावातील नागरिकांच्या वतीने कंपनीच्या नांदा प्रवेशद्वाराजवळ रविवार, दिनांक १६ मार्च रोजी सकाळी १० वाजता आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. या आंदोलनात कंपनीचा मुख्य मार्ग अवरोधित करून वाहतूक बंद करण्यात आली. कंपनीच्या मुख्य मार्गावर बंदी येताच सिमेंट कंपनी प्रशासनाने समस्येवर तोडगा काढण्यासाठी तातडीने बैठक बोलावली.
अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने आजूबाजूच्या गावांना दत्तक घेतले असून त्या गावांच्या समस्या सोडविणे हे कंपनी प्रशासनाचे कर्तव्य आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून कंपनी प्रशासनाने या मुद्याकडे दुर्लक्ष केले आहे. स्थानिक जनतेच्या अनेक प्रश्नांची व मागण्यांची पूर्तता कंपनी प्रशासन सहज करू शकत असूनही अद्याप त्यांची दखल घेतली नाही. भाजपच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
- पोलीस स्टेशन ते नथ्थु कॉलनीपर्यंत रोडवरील धूळ नियमितपणे स्वच्छ करून सकाळ-संध्याकाळ दोन वेळा पाणी मारणे.
- नांदा व आजूबाजूच्या परिसरात कंपनीच्या धुळीमुळे होणाऱ्या वायुप्रदूषणावर उपाययोजना करणे.
- नांदा गेटसमोरील झेंड्याजवळ लोडेड वाहनांमुळे निर्माण होणारी चिकणसर थांबवण्यासाठी रस्त्यावर नवीन काँक्रीट टाकणे.
- उर्वरित लोडर भरती त्वरीत सुरू करून स्थानिक बेरोजगारांना रोजगार देणे.
- कंपनीच्या वायुप्रदूषणामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असल्याने त्यांना हेक्टरी ५०,०००/- रुपये नुकसानभरपाई देणे.
- ओव्हरलोडेड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था होत असल्याने अशी वाहतूक थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे.
- सीएसआर निधीतून दत्तक गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या पांदन रस्त्यांचे काम प्राधान्याने करणे.
- सीएसआर निधीतून दत्तक गावातील रहिवाशांना विविध योजनांचा लाभ देऊन त्याची माहिती गावातील चावडीवर प्रसिद्ध करणे व दत्तक गावातील ITI तसेच पदवीधर युवकांना कंपनीच्या नोकरभरतीत प्राधान्य देणे.
या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात भाजपा तालुका अध्यक्ष संजय मुसळे, तालुका भाजपा महामंत्री सतीश उपलेंचीवार, गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे, नांदा शहराध्यक्ष संजय नित, रवी बंडीवार, सतीश जमदाडे, ताकसांडे, हरी बोरकुटे आणि दत्तक गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला..
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.