- "वर्तमान परिस्थितीत श्रमशक्तीचे अस्थिर भविष्य"
- वेकोलिच्या सास्ती-धोपताळा टाऊनशिप मध्ये १ मे ला रॅली व जाहिर सभा
- १ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या सास्ती-धोपताळा टाऊनशिप येथे दिनांक १ मे २०२२ रोज रविवारला आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त भव्य रॅली आणि जाहिर सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या समारोहाला कामगार, नागरिक, महिला यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन १ मे आंतरराष्ट्रीय कामगार उत्सव समितीने पत्रकार परिषदेत केले. या पत्रपरिषदेला आयटकचे केंद्रीय अध्यक्ष नंदकुमार म्हस्के, समितीचे सचिव दिलीप कनकुलवार, रायलेंगु झुपाका, शिरपुरम रामलू, पुरुषोत्तम मोहूर्ले उपस्थित होते.
या समारोहात अखिल भारतीय इलेक्ट्रिसिटी फेडरेशन चे केंद्रीय अध्यक्ष मोहन शर्मा, नागपुर, शेतकरी संघटनेच्या अभ्यासक व विश्लेषक प्राध्यापक प्रज्वला टत्ते, नागपुर आणि चंद्रपूर येथील जिजावू-सावित्री-रमाई मंचच्या डॉ. अभिलाषा गावतुरे इत्यादी प्रमुख मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी पाच वाजता कामगार वसाहतीत भव्य रॅली निघणार असून त्याचा समारोप सभास्थळी होणार आहे.
आजपासून १३६ वर्षापूर्वी १ मे १८८६ रोजी अमेरिकेतील औद्योगिक शहर असलेल्या शिकागो येथे भांडवलदारांच्या अत्याचार व दडपशाही विरोधात ५ लाख लोकांनी मिरवणूक काढली होती. यावर तेथील जुलमी सरकार व उद्योगपतींच्या समर्थकांनी भयावह व अमानुष लाठीचार्ज केला होता. यामुळे हजारो लोक जखमी झाले. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे कामगार नेते ऑगस्ट स्पाईस, अल्बर्ट पारसन्स, अल्डोफ फिशर आणि जॉर्ज अँगेल यांना शिकागोच्या हे मार्केट मध्ये फाशी देण्यात आले. मात्र त्यानंतर कामगारांना त्यांचे हक्क मिळण्यास सुरुवात झाली. दिनांक १४ जुलै १८८९ पासून आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. सास्ती येथे गेल्या तीस वर्षांपासून कामगार दिन विविध कार्यक्रमांनी साजरा होतो.
विविध श्रमनिष्ठ कामगारांचे प्रश्न आणि त्या सोडविण्यासाठी करावयाचे प्रयत्न आणि आजच्या समाजकारण, राजकारण, आर्थिक निती, राष्ट्रीय हिताचे मुद्दे, कामगार हित याविषयी सविस्तर मार्गदर्शन या कार्यक्रमात होते. कामगार, नागरिक, ठेकेदारी कामगार यांनी आपल्या परिवारासह या समारोहात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन १ मे आंतर राष्ट्रीय कामगार दिन उत्सव समितीने पत्रकार परिषदेत केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.