- क्रिप्टो करन्सी एक्सचेंज चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले
- देशभरात क्रिप्टो एक्सचेंजेसचवर जीएसटी विभागाच्या धाडी
- करचोरी विरोधात धडक मोहीम सुरु
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
मुंबई -
केंद्र सरकारने क्रिप्टो करन्सीचे ट्रेडिंग करणाऱ्या एक्सचेंज विरोधात धडक मोहीम सुरु केली आहे. वझीरएक्स या बड्या एक्सचेंजवर कारवाईनंतर आज शनिवारी जीएसटी विभागाने देशभरातील इतर क्रिप्टो एक्सचेंजवर धाडी घातल्या आहेत. या कारवाईने क्रिप्टो करन्सी एक्सचेंज चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
भारतात क्रिप्टो करन्सी व्यवहारांना कायदेशीर मान्यता नाही. आभासी चलनाबाबत सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडून अभ्यास केला जात आहे. मात्र दुसऱ्या बाजूला या आभासी चलनांमधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढल्याने सरकारची चिंता वाढली आहे. कोट्यवधी भारतीय क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणुकीकडे आकर्षित झाले आहेत.
क्रिप्टोला कायदेशीर मान्यता नसली तरी देशात क्रिप्टो एक्सचेंज जोरात सुरु आहेत. या एक्सचेंजमधून जीएसटी कर चुकवेगिरी आणि चोरी केल्याची खात्रिशीर माहिती जीएसटी विभागाला मिळाली आहे. त्यानुसार मुंबई जीएसटी आयुक्तालयाने शुक्रवारी ३१ डिसेंबर रोजी वझीरएक्स या आघाडीच्या क्रिप्टो एक्सचेंजवर धाडी टाकली. वझीरएक्सकडून जीएसटी कर, व्याज आणि दंडासह एकूण ४९.२ कोटी रुपये वसूल करण्यात आले.
दरम्यान आज शनिवारी जीएसटी आयुक्तालयाने ही मोहीम आणखी व्यापक केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देशभरात इतर एक्सचेंजवर अशाच प्रकारे तपासणी मोहीम राबवली जात आहे. या एक्सचेंजमधून मोठ्या प्रमाणात जीएसटी कर चुकवेगिरी तपासात निष्पन्न झाल्याचे जीएसटी अधिकाऱ्याने म्हटलं आहे.
क्रिप्टोचे बाजार भांडवल ३ लाख कोटी डॉलरच्या पुढे
एका अभ्यासानुसार २०२१ मध्ये क्रिप्टोकरन्सीत ३० अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली. क्रिप्टोचे बाजार भांडवल ३ लाख कोटी डॉलरच्या पुढे गेल. भारतासारख्या देशात अद्याप नियमन नसलेल्या या क्षेत्रात १.५० कोटींहून अधिक गुंतवणूकदार असून त्यांच्यामार्फत ६.६ अब्ज डॅलरचे व्यवहार होत असल्याचे मानले जाते. भारत हा डिजिटल वापराबाबत जगात दुस-या स्थानावर आहे. तर क्रिप्टोकरन्सी व्यवहाराबाबत त्याचा प्रमुख १५४ देशांमध्ये ११ वा क्रमांक लागतो. गेल्या तिमाहीत ही बाजारपेठ तब्बल ३००० टक्क्यांनी वाढली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.