- राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे वक्तव्य म्हणजे उलट्या बोंबाचाच प्रकार
- विदर्भातील जनतेला भूलथापा देण्याचा केविलवाणा प्रयत्न चालूच
- माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांची कडवट टीका
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे अनेकदा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार साहेबांनी दिनांक 17 नोव्हेंबर रोजी नागपूर येथे विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स व व्यापाऱ्यांसोबतच्या संवादात आणि चंद्रपूर येथे 19 नोव्हेंबरला बोलतांना राज्य सरकारांनी प्रादेशिक असमतोल दूर करावा, असे विधान करून विदर्भातील जनतेला भूलथापा देण्याचा केविलवाणा प्रयत्न चालूच ठेवला आहे. आधीच राज्य सरकारच्या महसुली उत्पन्नात कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून यत्किंचितही वाढ झालेली नसतांना आणि राज्याचा अर्थसंकल्प 67 टक्के कपात केलेली असताना पवार साहेबांचा हा पवित्रा म्हणजे उलट्या बोंबा असल्याची सडेतोड प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे नेते, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी केली आहे.
शरद पवार साहेबांनी सदैव विदर्भाचा द्वेष करीत विदर्भाच्या वाट्याचा निधी पश्चिम महाराष्ट्रात वळता करून विदर्भातील बेरोजगार युवक, शेतकरी व नागरिकांच्या विकासाच्या स्वप्नांची राखरांगोळी केली आहे. सिंचन, वीज, नोकरी, उद्योग, मूलभूत सुविधा या सर्व बाबतीत विदर्भाला सापत्नभावाची वागणूक देऊन शरद पवार साहेबांच्या काळात मोठा अनुशेष तयार झाला. येथील शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, वीजपुरवठा, प्रदूषण, कुपोषण, शेतमालाचे भाव, पिण्याचे पाणी यासह ग्रामीण भागातील विविध समस्या या विदर्भाच्या प्रश्नावर पवार साहेबांनी कधीच प्रांजळ भूमिका घेतली नाही. विदर्भ खनिज द्रव्ये, शेतीचे उत्पन्न, वीज निर्मिती केंद्रे, वन संपत्ती या सर्व बाबतीत सक्षम असतांना आणि सरकारला मोठा महसूल मिळवून देत असतांना विदर्भाचा अनुशेष भरून काढणे आणि विकासाच्या बाबतीत विदर्भाला पुढे नेण्यासाठी सत्ता असतांना पवार साहेबांनी कधीच प्रयत्न केला नाही, उलट येथील निधी पाश्चिम व उत्तर महाराष्ट्र यांचेकडे वळविण्यात धन्यता मानली. विदर्भात हजारो शेतकरी आत्महत्या करीत असतांना या जाणत्या राजाला येथील ज्वलंत समस्यांवर कधीच उपाय शोधण्यासाठी वेळ मिळाला नाही. विदर्भाच्या वाट्याचा निधी पाश्चिम व उत्तर महाराष्ट्रात वळता करून घेण्यासाठी पवार साहेबांना मराठी एक राहावेत, असा पुळका आला असून यासाठीच त्यांना विदर्भ हा महाराष्ट्रातच हवा आहे.
राज्याची आर्थिक स्थिती दिवाळखोरीची असून सन 2020-21 या आर्थिक वर्षात राज्याचे सर्व मार्गाचे महसुली उत्पन्न 3 लाख 47 हजार 457 कोटी आणि वर्षभराचा खर्च भागविण्यासाठी लागणारा निधी हा 3 लाख 56 हजार 968 कोटी असून अर्थसंकल्प 9 हजार 511 कोटी रुपये तुटीचा होता. या महसुली उत्पन्नापेक्षा राज्यावर असलेला कर्जाचा, थकहमीचा व लायबिलीटीज चा डोंगर हा 6 लाख 60 हजार 610 कोटी रुपये असून जानेवारी 2020 अखेर कर्ज आणि लायबिलीटीज ही 4 कोटी 33 लाख 901 कोटी रुपये आहे. राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या विधानाप्रमाणे 75 हजार कोटीचा महसूल वसूल होणे दुरापास्त आहे. याशिवाय केंद्र सरकार कडून जीएसटी पोटी येणे असलेले 24 हजार कोटी चालू वर्षात मिळण्याची शक्यता कमी आहे. म्हणुन राज्य सरकारने अर्थसंकल्पात 67 टक्के कपात जाहीर केली असून ती जिल्हा योजनेलाही लागु केली आहे. दिनांक 4 मे 2020 ला वित्त विभागाने परिपत्रक काढून फक्त वैद्यकिय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, व अन्न व औषधी प्रशासन वगळता सर्व खात्यांची नोकरभरती बंद केली आहे. आधीच राज्यात आठ वर्षापासुन अनुकंपा तत्त्वाची नोकरभरती बंद असून सात वर्षापासुन वर्ग 3 व 4 ची नोकरभरती बंद आहे. पगार देण्याची सोय नसल्यामुळे राज्यात सर्व विभागाची मिळून दोन लाख पदे रिक्त आहेत.
नागपूर करारानुसार 23 टक्के नोकरभरती विदर्भातील तरुणांमधून करण्याच्या दिलेल्या आश्वासनाचा भंग झाला असून विदर्भाचा सिंचन, सार्वजनिक आरोग्य, उद्योग, रस्ते, पिण्याचे पाणी, शिक्षण, ग्रामविकास, वीज, समाजकल्याण व आदिवासी विकास विभागाचा अनुशेष 75 हजार कोटी वर गेला असल्याची माहिती नागपूर वैधानिक विकास मंडळाचे वीस वर्षे तज्ञ सदस्य राहिलेल्या ॲड. मधुकर किंमतकर यांनी पुस्तिकेद्वारे जनतेपुढे आणली आहे. राज्य दिवाळखोरीत निघून कायमचे कर्जाच्या ओझ्याखाली दबले असल्यामुळे विदर्भाचा अनुशेष कदापिही भरून निघणे शक्य नाही.
वारंवार सत्ता येऊनही विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यात अपयशी ठरल्याची व विदर्भातील जनतेला निधी उपलब्ध नसतांनाही भूलथापा देण्याचा हा केविलवाणा प्रयत्न पवार साहेबांनी चालूच ठेवला आहे. वारंवार सत्तेत येऊनही नक्षलवादासारख्या सोशिओ इकॉनॉमिक प्रश्नाला न हाताळता उलट बोंबा करणाऱ्या राजा, हे तर तुझेच पाप आहे, हे न समजण्यासारखी जनता दुधखुळी राहिलेली नाही. आता आपल्या राजकिय महत्वाकांक्षेपायी विदर्भाला पुन्हा भूलथापा देऊन आपले राजकिय इप्सित साधण्याचा माननीय शरद पवार साहेब प्रयत्न करीत आहेत. मात्र विदर्भातील जनता या गोष्टीला पूर्णपणे ओळखत असून ती त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असे सडेतोड मत माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.