राजुरा -
आज मंगळवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास राजुरा-रामपूर-कवठाळा मार्गावरील वरोडा गावांसमोर असलेल्या खड्ड्यांमध्ये मोटर सायकल उसळून एक महिला जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात तणावाचेे वातावरण निर्माण झाले असून काही काळ या मार्गावरील वाहतूक रोखण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार भारोसा येथील अल्का भास्कर गोखरे वय 45 या आपल्या नातेवाईकांसोबत साखरी येथील मावसबहिणीकडे येत होत्या. वरोडा या गावाजवळ एका मोठ्या खड्यात मोटारसायकल उसळल्याने मोटर सायकलवर बसून असलेल्या अल्का गोखरे या मागे उसळून पडल्या असता मागून येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच 34 एन 1571 या वाहनांने ती महिला जागेवर चिरडल्या गेली यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
राजुरा-रामपूर-कवठाळा या मार्गाचे काम मागील दोन वर्षांपासून सुरु आहे परंतु सहा महिन्यांपासून या रस्त्याचे बांधकाम थांबले असल्याने रस्त्यावर मोठं मोठे खड्डे निर्माण झाले असून धुळीचे लोंढे उडत असल्याने मोठ्या वाहनामागे असलेल्या मोटर सायकलस्वारांना खड्डे दिसत नसल्याने यात अनेकदा अपघात घडले आहे.
या रस्त्याच्या बांधकामासंबंधी गावागावात रस्ता रोको आंदोलन झाले मात्र या आंदोलकांकडे संबंधित विभागाचे लक्ष न दिल्याने या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अश्यातच नागरिकही रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे. या मार्गावर आणखी किती जीव घेणार मग त्यांनतर रस्ता बांधकाम करणार आहे असा संतप्त सवाल शिवसेनेचे उपतालुका प्रमुख तथा रामपूर ग्राम पंचायतीचे सदस्य रमेश झाडे व युवासेनेचे बंटी मालेकर यांनी केला आहे. रस्त्याचे बांधकाम त्वरित सुरू न केल्यास रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा या दोघांनी दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.