Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कु. आशाच्या पार्थिवावर साखरीत अंत्यसंस्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
प्रकल्पग्रस्तांत संतापाची लाट तेली समाजाने केली वेकोलीच्या क्षेत्रीय योजना अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी अनिल गंपावार - ...

  • प्रकल्पग्रस्तांत संतापाची लाट
  • तेली समाजाने केली वेकोलीच्या क्षेत्रीय योजना अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी

अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा तालुक्यातील साखरी या गावातील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍याची तरुण मुलगी कु. आशा घटे हिने वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रातील नियोजन अधिकारी जी.पुलय्या यांच्या अपमानास्पद बोलण्याच्या प्रकारामुळे आत्महत्या केली. या तरुणीने पाच दिवस मृत्यूशी झुंज दिली अखेर ती अयशस्वी ठरली. दिनांक 31 मार्चला क्षेत्रीय महाव्यवस्थापक यांच्या कार्यालयापुढे प्रेतासह ठिय्या मांडल्यानंतर रात्री साखरी या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. कु. आशा हिने आत्महत्या केल्याच्या घटनेने आज संपूर्ण गाव सुन्न झाले होते. तिच्या साखरी गावात सर्वत्र दुःख व्यक्त करण्यात येत होते. रात्री साश्रू नयनांनी गावकर्‍यांनी आपल्या या लेकीला अंतिम निरोप दिला. यावेळी शेकडो प्रकल्पग्रस्त सुद्धा उपस्थित होते. 

दिनांक 31 मार्चला दुपारी एक वाजता तक्रार नोंदवायला गेल्यावर राजुरा ठाण्यात फिर्यादीना दोन तास बसवून ठेवण्यात आले. शेवटी मुलीचे वडील निघून गेले. रात्री आठ वाजता पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर मृत मुलीचे पालक तक्रार देण्यासाठी पुन्हा पोलीस ठाण्यात गेले. तिथे तक्रारीची नोंद करण्यात आली. मात्र अनेकदा मागूनही त्याची सत्यप्रत पोलिसांनी दिली नाही. रात्री अकरा वाजेपर्यंत हे अन्यायग्रस्त कुटुंब ठाण्यात तक्रारीच्या प्रतीसाठी बसले होते. मात्र तक्रार प्रत दिली नाही आणि गुन्हाही दाखल झाला नाही. यामुळे पोलिसांविषयी अविश्वास निर्माण झाला आहे. पोलीस हे वेकोलि अधिकाऱ्यांचे धार्जिणे असल्याचा आरोप अन्यायग्रस्त कुटुंबाने व प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.

वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रीय कार्यालयात आज निराशेचे वातावरण होते. आज सीजीएम व नियोजन अधिकारी हे दोघेही कामावर हजर नव्हते. नियोजन अधिकाऱ्यांच्या गैरप्रकाराची चौकशी झाली तर बर्‍याच नियमबाह्य गोष्टी व गैरव्यवहार बाहेर येईल, अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर अनेक प्रकल्पग्रस्तांनी दिली. काही लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या दलाल लोकांनी सीजीएम कार्यालयात येऊ नये, असे सांगण्यात आल्याचे समजते. 

या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद दिसत आहे. तक्रार न घेता ताटकळत ठेवणे व तक्रारीची कॉपी न देणे आणि एवढा वेळ होऊनही गुन्हा दाखल न करणे, यावरुन पोलिसांच्या कार्याविषयी संशय निर्माण झाला आहे. आता पुढे काय कार्यवाही होते, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

तेली समाजाने केली वेकोलीच्या क्षेत्रीय योजना अधिकारी पुलय्या वर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी
आशा तुळशीराम घटे हिला आत्महत्येला प्रवृत्त केल्यामुळे व तिने त्या कारणामुळे आत्महत्या केल्यामुळे गैरअर्जदारावर आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करून गैरअर्जदारास सेवेतून बडतर्फ करण्याबाबत तक्रार अर्ज / निवेदन तेली समाज राजुरा च्या वतीने पोलीस निरीक्षकांना देण्यात आले. 

सास्ती येथील मय्यत कु. आशा तुळशिराम घटे यांच्या वडीलाची शेती वेकोलि मार्फत संपादीत करण्यात आली होती. त्या अनुषंगाने मय्यत कु. आशा घटे ही वेकोली मार्फत लाभार्थी असल्यामुळे तिच्या नौकरीसाठी मय्यत ही तिचे नातेवाईका सोबत धोपटाळा येथील वेकोली कार्यालयात दि. २२ मार्च ला नौकरीसाठीचे सर्व दस्ताऐवज घेवून गेली होती. नौकरीबाबतचे वेकोलि कडील काम हे गैरअर्जदार करतात. त्यादिवशी गैरअर्जदार यांनी मय्यत कु. आशा घटे हिला अपमानास्पद वागणुक दिली व त्यामुळे मय्यत कु. आशा घटे हिच्या मनावर परिणाम झाला व त्याकारणामुळे तिने सास्ती येथे घरी येवून गैरअर्जदाराने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यामुळे विष प्राशन केले. त्यानंतर दि. ३१ मार्च रोजी तिचे चंद्रपूर येथे दुखद निधन झाले. असा आरोप समाजातील लोकांनी लावला आहे. 

पिडीत मय्यत आशा घटे ही तेली समाजाची युवती असल्यामुळे तिला व तिच्या परिवारातील लोकांना न्याय मिळावा म्हणून समाजबांधव या नात्याने तेली समाजाचे वतीने प्रस्तुत लेखी तक्रार तसेच निवेदन दाखल करण्यात येत आहे अशी माहिती दिली आहे. 

या निवेदनाची प्रतिलिपी कोळसा मंत्री, भारत सरकार, नई दिल्ली,  पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळु धानोरकर, आमदार सुभाष धोटे, जिल्हाधिकारी चंद्रपूर, पोलीस अधिक्षक चंद्रपूर, उपविभागीय अधिकारी राजुरा, तहसिलदार राजुरा, उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा आदींना तेली समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.



Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top